बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी आणि आयुषमान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील लूकची प्रचंड चर्चा रंगली आहे. अनेकांनी हा लूक कॉपी केल्याचं म्हटलं आहे. छायाचित्र पत्रकार मयंक ऑस्टन सूफी यांनी अमिताभ बच्चन आणि दिल्लीतील एका व्यक्तीचा फोटो कोलाज करुन हा लूक एकमेकांशी मिळता जुळता असल्याचं म्हटलं आहे.

बिग बी कायम उत्तम अभिनयासोबत त्यांच्या चित्रपटातील लूकमुळे चर्चेत असतात. बऱ्याच वेळा ते चित्रपटांमध्ये वेगवेगळे लूक आजमावण्याचा प्रयत्न करतात. ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात त्यांचा लूक अनेकांचं लक्ष वेधणारा आहे. यात लांब पांढरी दाढी, लांब मोठं नाक, जुना भिंगाचा चष्मा आणि गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ असा त्यांचा एकंदरीत या चित्रपटातला लूक आहे. मात्र हा लूक त्यांनी दिल्लीतील एका व्यक्तीवरुन केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

मयंक ऑस्टन सूफी यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतील एका व्यक्तीचा फोटो काढला होता. यात त्यांचा लूक आणि ‘गुलाबो सिताबो’मधील बिग बी या दोघांचाही लूक एकदम सारखा आहे. त्यामुळेच त्यांनी हा फोटो शेअर केला. मात्र अनेकांनी हा लूक कॉपी केल्याचं म्हटलं आहे.

“अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील लूक अगदी दिल्लीतील त्या माणसासारखा आहे, ज्याचा फोटो मी गेल्या वर्षी काढला होता. तसाच स्कार्फ, दढी आणि चष्मा”‘, असं कॅप्शन मयंक सूफी यांनी दिलं आहे. त्यामुळे सध्या या फोटोची आणि लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

दरम्यान, हा चित्रपट लॉकडाउन असल्यामुळे १२ जून रोजी अमॅझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून साऱ्यांनाच  या चित्रपटाविषयीची उत्सुकता आहे.