मनोरंजन विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताकडून ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. शनिवारी याची घोषणा करण्यात आली आणि सोशल मीडियावर ‘गली बॉय’चे मुख्य कलाकार रणवीर सिंग, आलिया भट्ट व दिग्दर्शिका झोया अख्तरवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. अवघ्या काही वेळातच ट्विटरवर ‘गली बॉय’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. त्याचवेळी आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेला ‘अंधाधून’सुद्धा जोरदार ट्रेण्ड होऊ लागला. ‘गली बॉय’च्या ऐवजी ‘अंधाधून’ची ऑस्करसाठी निवड व्हायला पाहिजे होती अशी इच्छा नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

‘गली बॉय’ हा चित्रपट उत्तमच आहे पण ‘अंधाधून’ सर्वोत्तम आहे, असं म्हणत ट्विटरकरांनी ‘अंधाधून’चा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आणला. कमी बजेटचा चित्रपट असूनसुद्धा ‘अंधाधून’ने प्रेक्षकांची मनं जिंकली अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

एकमेकांत अडकलेल्या चित्रविचित्र प्रश्नांची मालिका श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर मांडली होती. एकापाठोपाठ एक शब्दश: अंदाधुंद कारभार वाटावा अशा घटना या चित्रपटात घडतात आणि त्याचा शेवट मात्र प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. या चित्रपटाची प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून स्तुती झाली होती. त्यामुळे ‘ऑस्कर’साठी ‘अंधाधून’ची निवड व्हायला पाहिजे होती, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.