X

गलीबॉय रणवीरनं संपवली ‘खान’दानाची सद्दी

बॉलिवूडच्या ‘खान’दानाला मागे टाकत रणवीरने बॉक्स ऑफिस, सोशल मीडियावर बाजी मारली आहे.

२०१८ हे वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलं. या वर्षाने ‘संजू’, ‘राझी’,’अंधाधून’,’स्त्री’, ‘पॅडमॅन’,’पदमावत’ आणि ‘सिम्बा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे २०१८ हे वर्ष चाहत्यांसाठी चित्रपटाच्या मेजवानीचं ठरलं. विशेष म्हणजे या चित्रपटांसोबतच अनेक कलाकारांनी त्यांच्यातील अभिनयाची चुणूक दाखवून स्वत:ला सिद्ध केलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता रणवीर सिंह. रणवीरने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील तिन्ही खान मंडळींवर मात केली आहे.

बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ‘खान’दानाचं वर्चस्व आहे. मात्र गेल्या वर्षात हे समीकरण पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळालं. २०१८ मध्ये बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ला मागे टाकत अभिनेता रणवीर सिंहने आपली जागा कायम केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा ‘झीरो’ ,आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि सलमानचा ‘रेस ३’ या चित्रपटांनी तिकीटबारीवर सरासरी कमाई केली. मात्र रणवीरचा ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले. या चित्रपटांनी अनुक्रमे ५८५ कोटी आणि ३२१ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे बॉलिवूडच्या ‘खान’दानाला मागे टाकत बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया अशा सर्वच ठिकाणी रणवीरने बाजी मारली आहे.

२०१८ प्रमाणेच रणवीरच्या नव्या वर्षाची सुरुवात देखील दणक्यात झाली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ला त्याचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ चार दिवसांमध्ये ७० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये रणवीरचे सुगीचे दिवस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहेत.

रणवीरने आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये विविधांगी भूमिकांना न्याय दिला असून त्याची खलनायकाची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. ‘पद्मावत’मध्ये रणवीरने अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेवरही प्रेक्षकांनी प्रेम केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान कायम केलेल्या रणवीरकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असून त्याने काही चित्रपटांसाठी होकारही कळविला आहे.

दरम्यान, रणवीर लवकरच कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात झळकणार आहे. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट असून रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.