हीर-रांझा, सोनी-मेहवाल, सास्सी-पुन्नुन, सुलतान-रूमाना यांसारख्या पंजाबी प्रेमकहाण्या लोकप्रिय आहेत. अनेकांच्या मनात घर करुन बसलेली अशीच एक प्रेमकथा म्हणजे ‘मिर्झा-साहिबान’ची. ‘रंग दे बसंती’फेम दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा या प्रेमकथेवर चित्रपट बनविणार आहेत. वास्तविक स्वत:च्या चित्रपटाच्या पटकथा स्वत:च लिहिण्यासाठी मेहरा प्रसिद्ध आहेत. परंतु, पंजाबी प्रेमकथेला काव्यात्म रूप देण्यासाठी आणि अगदी तरुण असल्यापासूनची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने मेहरा यांनी मिर्झा-साहिबानवरील चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक-कवी गुलजार साहेबांना विचारणा केली असून त्यांनी पटकथा लिहिण्याची तयारी दर्शविली आहे.
२००९ साली ‘दिल्ली सिक्स’ या चित्रपटावर काम करीत असतानाच ‘मिर्झा-साहिबान’ यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनविण्याचे मेहरा यांनी ठरविले. सध्या ते ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात व्यस्त असून त्यानंतर ‘मिर्झा’ हा चित्रपट करणार आहेत. बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर ‘जोधा अकबर’ चित्रपटानंतर ऐतिहासिक-पौराणिक स्वरुपाची प्रेमकथा गाजलेली नसून मेहरा यांच्यासारखे संवेदनशील दिग्दर्शक आणि गुलजार यांची लेखणी यांच्या संयोगातून साकारलेला चित्रपट ‘मिर्झा-साहिबान’ यांची लोकप्रिय कथा काव्यात्म पातळीवर नेतील यात शंका नाही. फक्त ‘मिर्झा-साहिबान’ या व्यक्तिरेखांसाठी कोणत्या अभिनेत्याची आणि बॉलीवूड रूपवतीची निवड होते त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असेल हेही तितकेच खरे. यापूर्वी ‘मिर्झा साहिबान’ याच नावाने १९४७ आणि १९५७ साली हिंदी चित्रपट येऊन गेले. त्यात अभिनेत्री नूरजहाँ आणि अभिनेत्री श्यामा यांनी ‘साहिबान’ ही व्यक्तीरेखा, तर शम्मी कपूरने ‘मिर्झा’ ही व्यक्तिरेखा रूपेरी पडद्यावर साकारली होती.