महाराष्ट्र ललित कला निधी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ आणि २० ऑगस्ट रोजी मुंबईत दोन दिवसांचा गुणीजान संगीत महोत्सव आयोजित करण्यात आाला आहे. दिवंगत पं. भीमसेन जोशी यांच्या नातू विराज, दिवंगत तबलवादक पं. चतुरलाल यांचा नातू प्रांशू, युवा बासरीवादक पंकजनाथ व पारसनाथ, गायिका अमृता काळे हे यात आपली कला सादर करणार आहेत. पहिल्या दिवशीच्या सत्रात विराज जोशी व पंकजनाथ आणि पारसनाथ हे सहभागी होणार असून २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सत्रात प्रांशू चतुरलाल तबलावादन सादर करणार आहे. महोत्सवाची सांगता अमृता काळे यांच्या गायनाने होणार आहे.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चौथ्या मजल्यावरील ‘रंगस्वर’ सभागृहात दोन्ही दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.दिवंगत ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. सी. आर. व्यास यांचे ‘गुणीजान’ हे टोपणनाव असून त्यांनी व दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, नाटककार विद्याधर गोखले यांनी महाराष्ट्र ललित कला निधी या संस्थेची स्थापन केली होती. मुंबईत २००६ पासून ‘गुणीजान संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.