पन्नास-साठच्या दशकांतील महान चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गुरूदत्त आज एक दंतकथा बनून राहिले आहेत. त्यांच्या ‘कागज के फूल’, ‘प्यासा’, ‘साहब बीबी और गुलाम’सारख्या चित्रपटांनी इतिहास घडवला. हिंदी चित्रपटांच्या मुख्य धारेत राहूनही आपल्या चित्रपटांना अभिजाततेचा दर्जा मिळवून देणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. तथापि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या हयातीत मात्र आपल्या या महानपणाचं सुख अनुभवता आलं नाही. एकीकडे रूपेरी पडद्याची, त्याच्या जादुई आकर्षणाची अनिवार ओढ (ओढ कसली? वेडच!) आणि दुसरीकडे विस्कटलेलं व्यक्तिगत आयुष्य यांच्यातील कुतरओढीनं ते स्वत:वरचं नियंत्रण गमावून बसले आणि त्यांनी व्यसन जवळ केलं. पुढे त्यातच त्यांनी आपला अंतही ओढवून घेतला. शापित गंधर्वासारखं त्यांचं जीवन आजवर अनेक सृजनशील कलावंतांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय झालं आहे. त्या कुतूहलातूनच त्यांच्यावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्यांच्या चित्रकृतींवरील संशोधनपर पुस्तकं जन्माला आली.. आजही येत आहेत. त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास हा आज भारतीय चित्रपट अभ्यासकांच्या पाठय़क्रमाचा अविभाज्य भाग बनला आहे. गुरूदत्तच्या जीवनावर चित्रपट वा नाटय़कृती मात्र आजवर आली नव्हती. परंतु आता गुरूदत्त आणि त्यांची पत्नी गीता दत्त यांच्या वादळी वैवाहिक जीवनावर आधारित सैफ हैदर हसन लिखित-दिग्दर्शित ‘गर्दिश में तारे’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलेलं आहे. सोनाली कुलकर्णी आणि आरिफ झकारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेलं हे नाटक त्यांच्या सहजीवनाचं विषण्ण करणारं चित्र उभं करतं. हे दोन प्रतिभासंपन्न कलावंत परस्परांचे जोडीदार म्हणून मात्र अयशस्वी ठरतात. काय कारण असावं बरं यामागे? त्यांचा अहम्? त्यांच्या परस्परांकडूनच्या अवास्तव अपेक्षा? माणूस आणि कलावंत यांच्या भौतिक व कलात्मक अपेक्षांमध्ये झालेला अटळ संघर्ष? की नियतीचा अतक्र्य खेळ?.. यापैकी नेमकं काय कारणीभूत झालं असेल त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा खेळखंडोबा व्हायला?.. प्रश्न.. प्रश्न.. आणि प्रश्न.. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न जो-तो आपापल्या परीनं करतो आहे. त्याचीच एक फलश्रृती म्हणजे हे नाटक.. ‘गर्दिश में तारे’! 

अर्थात या नाटकातही या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीतच. गुरूदत्त आणि गीताच्या आयुष्यातील ताणतणाव ‘गर्दिश में’मध्ये मांडण्यात आले आहेत. त्यातून प्रेक्षकांनी आपापल्या परीनं या प्रश्नांची उत्तरं शोधावीत. ‘गर्दिश में तारे’ थेटपणे गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्या जीवनावरचं आहे असं न म्हणता ते त्यांच्या जीवनावर सैलपणे ‘आधारित’ असल्याचा खुलासा आधीच करण्यात आला असला, तरीही नाटकात वापरण्यात आलेली गाणी मात्र गुरूदत्तच्या चित्रपटांतील गीता दत्त यांनी गायलेली आहेत. गुरूदत्त-गीताच्या जीवनावरील नाटक म्हटल्यास काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाटककर्त्यांना वाटली असावी. म्हणून मग पात्रांची नावं गुरूदत्तऐवजी ‘देवदत्त बोस’ आणि गीता दत्तऐवजी ‘भावना देवदत्त’ अशी बदलण्यात आली आहेत. स्वाभाविकच गुरूदत्तच्या जीवनातील तिसरा कोन असलेल्या वहिदाचंही नाव ‘अफसाना’ करण्यात आलं आहे.
पत्ररूप संवाद, प्रसंग सादरीकरण आणि फ्लॅशबॅक स्वरूपात नाटक उलगडत जातं. देवदत्त.. एक यशस्वी चित्रपटकर्ता. त्याची पत्नी भावना.. एक उत्तम गायिका. देवदत्तनं गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेपासून नाटकास आरंभ होतो. या घटनेनं फिल्म इंडस्ट्रीत माजलेली खळबळ.. याप्रकरणी देवदत्तची पत्नी भावनाची पोलीस चौकशी होते. तिचा जाबजबाब नोंदवला जातो. त्यातून मग नाटक फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जातं.
एकेकाळी लैला-मजनूच्या ढंगात परस्परांवरील प्रेम व्यक्त करणारे हे दोघं पुढं एकमेकांपासून कसे दुरावले गेले, हे भावनाच्या जबानीतून उघड होत जातं. परंतु हे करताना भावनाच्या दृष्टिकोनातून वास्तव न मांडता ते त्रयस्थपणे मांडलेलं आहे. अन्यथा भावनाच्या दृष्टीतून देवदत्तचं मूल्यमापन झालं असतं. आणि ते कदाचित देवदत्तवर अन्याय करणारं ठरू शकलं असतं. ‘गर्दिश में’मध्ये कुणा एकाची बाजू न घेता त्या दोघांदरम्यान जे घडलं ते दाखवण्यात आलं आहे. त्यांचा न्यायनिवाडा करणं नाटककारानं टाळलं आहे. ही यातली सकारात्मक गोष्ट आहे. दोन प्रतिभावान कलावंत एकमेकांपासून का दुरावतात? परस्परांना बोचकारण्यापर्यंत का टोकाला जातात? देवदत्तच्या अपयशाचा आसुरी आनंद व्हावा इतका तिरस्कार भावनाच्या मनात का निर्माण व्हावा? कलाजीवन आणि व्यक्तिगत जीवन यांची गल्लत केल्याचा तर हा परिणाम नव्हे? की कलेच्या धुंदीत आपलं एक व्यक्तिगत आयुष्यही आहे, त्यासही आपण काही देणं लागतो, हे देवदत्त साफ विसरल्यानं हा संघर्ष टोकाला गेला? कलावंत आपल्या कलेच्या धुंदीत माणूसपणही विसरतो? जोडीदाराच्या चुकांचा, भरकटण्याचा सूड म्हणून दुसऱ्यानंही व्यसनाच्या आहारी जात अध:पतनाचा मार्ग स्वीकारावा? की मूलत:च ती त्यांची प्रवृत्ती आहे? की त्यांचं प्रवाहपतित होत वाहवणं हा नियतीचाच अगम्य खेळ आहे?.. नाटक पाहताना असे अनेक प्रश्न पडतात. पण त्यांची उत्तरं सापडत नाहीत. शोधावी म्हटली तरी त्यातून आणखी नव्या प्रश्नांची भेंडोळी निर्माण होते. इतकी संवेदनशील कलावंत असलेली ही माणसं आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे प्रश्न सोडवू शकत नाहीत? असाही प्रश्न पडतो.
खरं तर आयुष्याच्या अशा भीषण गुंत्यांमध्ये अडकलेल्या माणसांकडे आपल्या समस्यांवरची उत्तरं असत नाहीत. आणि समजा असली, तरी ती प्रत्यक्ष आचरणं महाकर्मकठीण. आपल्या आयुष्यात झालेला काला त्यांना संपवायचा असतो; परंतु ज्या व्यक्तींच्या बाबतीत ही शल्यक्रिया करायची असते त्यांच्यात ते आतडय़ानं गुंतलेले असतात. हे गुंतलेपण सहजपणे सोडवणं अशक्यच असतं. त्यामुळे त्या असह्य़ ओझ्याखाली नाती करपत जातात.. विसवत जातात.. कोरडीठाक होत जातात. आणि एके दिवशी तुटूनही जातात. आणि हे सगळं उघडय़ा डोळ्यांनी बघत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो त्या माणसासमोर. याचे आघात कोसळवून टाकणारे असतील, हे माहीत असूनदेखील! ‘गर्दिश में तारे’मधील देवदत्त आणि भावनाचं हेच प्राक्तन आहे.
लेखक-दिग्दर्शक सैफ हैदर हसन यांनी गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्या जीवनावर या नाटकाद्वारे झोत टाकला आहे. अर्थात त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा हसन यांचा दृष्टिकोन उभयतांमध्ये जे घडलं ते मांडण्याचा आहे. त्यात काल्पनिकतेचे रंगही मिसळले आहेत. या दोघांमधील कळीचा मुद्दा असलेली अफसाना मात्र या चित्रात अभावानंच येते. तिच्या बाबतीत संदिग्ध मौन पाळलेलं दिसतं. देवदत्तही तिच्याबद्दल शक्यतो मूक राहणंच पसंत करतो. परिणामी देवदत्त आणि भावना यांच्यातील दुराव्याचं मुख्य कारण समोर येतच नाही. त्यामुळे नाटकात नाटय़पूर्णतेचा उत्कर्षबिंदू येतच नाही. ते सपक, समतल असंच पुढं सरकतं. विजोड कलावंत जोडप्याचं प्रवाहपतित आयुष्य एवढय़ावरच नाटक सीमित होतं. परस्परांना द्यायला वेळ नसल्यानं त्यांच्यात अंतराय निर्माण झालाय असं प्रथमदर्शनी वाटतं खरं; पण त्याही पल्याड बरंच काही घडलंय त्यांच्या आयुष्यात.. जे नाटकात येत नाही. ते एकमेकांपासून दुरावण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. त्यांचे स्वभाव, प्रवृत्ती, त्यांचा अहम्, परस्परांना गृहीत धरण्याची चूक, अध:पतन, सूड, तृष्णा.. आणखीनही बरंच काही. या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्यांचं विस्कटलेलं वैवाहिक जीवन. आणि त्याचीच परिणती म्हणजे देवदत्तची आत्महत्या! सैफ हैदर हसन यांनी या कलावंतांचं आयुष्य नाटकात मांडलंय खरं; परंतु त्यातली गहिरी वेदना मात्र प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. ती पृष्ठपातळीवरच राहते. नेपथ्यापासून प्रकाशयोजनेपर्यंत सगळंच ‘आहे मनोहर, तरीही..’ वाटत राहतं. याचं कारण आशयाचा तळ गाठण्याची असोशी नाटकात कुठंतरी हरवली आहे. जी ‘तुम्हारी अमृता’च्या नुसत्या अभिवाचनातही उत्कटतेनं जाणवते.
सोनाली कुलकर्णी यांनी भावनाची घुसमट, तिचं अध:पतन, देवदत्तबद्दलची कमालीची चीड, संताप, तिरस्कार उत्तमरीत्या अभिव्यक्त केली आहे. परंतु तिचं देवदत्तवरचं प्रेम मात्र त्या तरलतेनं व्यक्त होत नाही. म्हणूनच नाटकाचा शेवट बेगडी वाटतो. ‘पतझड की आवाज’च्या कोसळण्यानं आत्मविश्वास गमावलेला, त्यापायी खचलेला, व्यक्तिगत आयुष्यातील पेचांनी हैराण झालेला, निष्प्रेम जगण्याला विटलेला, परिणामी आयुष्याबद्दल कडवट झालेला देवदत्त- आरिफ झकारिया यांनी संयतपणे साकारला आहे.