ग्यान कोरिया यांचा ‘द गुड रोड’ हा गुजराती चित्रपट ऑस्करमधून बाद झाला आहे. परदेशी चित्रपट गटात त्याला नामांकन देण्यात आले होते, पण अकादमीच्या पात्रतेच्या लघुयादीत त्याचा समावेश होऊ शकला नाही. गेल्या ५० वर्षांत प्रथमच ऑस्करसाठी पाठवलेला पाकिस्तानचा ‘जिंदा भाग’ हा चित्रपटही बाद झाला आहे. नऊ चित्रपट पुढच्या फेरीत गेले असून एकूण ७५ चित्रपटांना या गटात नामांकन मिळाले होते. खरे तर अनेकांना ‘लंचबॉक्स’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळेल असे वाटत असतानाच ‘द गुड रोड’ या चित्रपटाचे नामांकन झाले. ८६ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करताना ‘शिप ऑफ थिसियस’ व ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांचा पर्यायही होता. करण जोहर, अनुराग कश्यप हे ‘द लंचबॉक्स’चे निर्माते, तर रितेश बात्रा हे दिग्दर्शक होते; त्यांनी भारताच्या ऑस्कर निवड समितीवर ‘द गुड रोड’ला नामांकन दिल्याने टीकाही केली होती. कंबोडियाचे रिथी पन्ह यांचा द मिसिंग पिक्चर, जर्मनीच्या जॉर्ज मास यांचा टु लाइव्हज, ब्रुस लीचे मार्शल आर्ट शिक्षक इप मॅन यांच्यावरील ‘द ग्रँडमास्टर’ हा वाँग करवाय यांचा चित्रपटही पुढच्या फेरीत गेला आहे.
 हंगेरीचा द नोटबुक (जॅनोस सझाज), इटलीचा द ग्रेट ब्युटी (पावलो सॉरेंटिनो) पॅलेस्टाइनचा ओमर (हनी अबू असाद) हे चित्रपट पुढे सरकले आहेत. इराणचे दिग्दर्शक असगार फरहादी यांच्या ‘द पास्ट’ चित्रपटाला आश्चर्यकारकरीत्या बाद करण्यात आले आहे. त्यांना २०१२ मध्ये अ सेपरेशन या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाले होते. इजिप्तचा ‘विंटर ऑफ डिसकंण्टेट’, इस्रायलचा ‘बेथलहेम’ हे चित्रपट अपेक्षा असूनही पुढची फेरी गाठू शकले नाहीत. निवडीची पुढची फेरी १० व १२ जानेवारीला न्यूयॉर्क व लॉस एंजल्स येथे होत आहे.
ऑस्कर नामांकनाच्या पुढच्या फेरीत गेलेल्या चित्रपटात ‘अॅन एपिसोड इन द लाइफ ऑफ अॅन आयर्न पिकर’ (बोस्निया), ‘नो मॅन्स लँड’ (हझेगोव्हिना- दिग्दर्शक डॅनिस तानोविक) तानोविक यांनी इमरान हाशमी समवेत या चित्रपटाचे भारतात चित्रीकरण केले आहे. बेल्जियमचा ‘द ब्रोकन सर्कल ब्रेकडाऊन’ (फेलिक्स ग्रोनिगेन), डेन्मार्कचा ‘द हंट’ (दिग्दर्शक थॉमस व्हिंटेरबर्ग) हे दोन्ही चित्रपट पुढच्या फेरीत गेले आहेत. ‘द हंट’ या चित्रपटाने मे महिन्यात कान महोत्सवात खळबळ उडवली होती. एका व्यक्तीला विनाकारण मुलांच्या लैंगिक शोषणात गुंतवल्याच्या कथेवर तो आधारित आहे.