पाण्यासारख्या भीषण समस्येवर भाष्य करणारा H2O हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाच्या माध्यमातून श्रमदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाच्या कलाकारांनीही श्रमदान करत आपलं कर्तव्य बजावलं आहे.

महाराष्ट्राला उन्हाळाच्या झळा बसत असतानाच, त्याची तमा न बाळगता ‘H2O’ चित्रपटातील सर्व कलाकारांनी ‘पाणी फाऊंडेशन’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तिसी गावात सुरु असलेल्या श्रमदान शिबिरात उत्साहाने सहभाग घेत, तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे. चित्रपटातही या कलाकारांनी एकत्र येऊन, श्रमदान करून प्रेक्षकांना एक सामाजिक संदेश दिला आहे. हा संदेश फक्त चित्रपटापुरता मर्यादित न ठेवता कलाकारांनी प्रत्यक्षातही अंमलात आणला. या चित्रपटाच्या माध्यमातून पाण्यासारख्या भीषण समस्येचे गांभीर्य कळल्याचे चित्रपटातील कलाकार आवर्जुन सांगतात.

कहाणी थेंबाची अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती सुनिल म. झवर यांनी केली आहे. या चित्रपटात अशोक एन. डी., शीतल अहिरराव, धनंजय धुमाळ, सुप्रित निकम आणि किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.