धग सारखा वेगळ्या विषयावरचा संवेदनशील सिनेमा करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या आगामी ‘हलाल’ या सिनेमाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (PIFF) झाली आहे. पिफच्या स्पर्धा विभागात या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे.
या महोत्सवात ‘हलाल’ या सिनेमाचे पहिल्यांदाच स्क्रिनिंग होणार आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर  या कलाकारांच्या भूमिका आहेत
लेखक राजन खान यांच्या ‘हलाल’ या कांदबरीवर आधारित हा सिनेमा मुस्लीम धर्मातील विवाहसंस्थेवर भाष्य करतो. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचे सूर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच महोत्सवाने दखल घेतलेला ‘हलाल’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच वेगळा प्रयत्न ठरेल.