लॉकडाउनमुळे कालाविश्वाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. खासकरुन छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आर्थिक फटका बसल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच ‘हमारी बहू सिल्क’ या मालिकेत काम करणारा अभिनेता झान खानने मालिकेमध्ये काम केल्यानंतर मानधन न मिळाल्याचे सांगत निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला होता. आता याच मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री वंदना विठलानी यांना देखील आर्थिक फटका बसल्याचे दिसत आहे. त्या सध्या राख्या बनवून विकत आहेत आणि घर चालवत असल्याचे समोर आले आहे.

वंदना यांनी नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्या आर्थिक संकटात असल्याचे सांगितले आहे. ‘मी मे महिन्यापासून ते ऑक्टोबर २०१९पर्यंत मालिकेचे शूट केले. पण मला फक्त मे महिन्याचे मानधन मिळाले. आता माझी संपूर्ण सेविंग देखील संपत आली आहे. मला नोव्हेंबर २०१९मध्ये मुस्कान या मालिकेमध्ये रोल मिळाला होता. पण ती मालिका देखील दोन महिन्यातच बंद झाली. मला या मालिकेसाठी पैसे मिळाले होत पण ते किती दिवस पुरणार’ असे वंदना म्हणाल्या.

‘मी आता राख्या बनवण्यास सुरुवात केली असून त्या ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते आणि त्यातून मला थोडे फार पैसे देखील मिळतात. माझे पती विपुल थिएटर आर्टिस्ट आहेत आणि त्यांना देखील या महामारीचा फटका बसला आहे. मी जानेवारी महिन्यात एका मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. पण ते देखी बंद झाले. मी आर्थिक संकटात अडकले आहे. माझ्या मुलांच्या शाळेची आणि कॉलेजची फी भरायची आहे. मी काही प्रोजेक्टसची वाट पाहत आहे’ असे त्या पुढे म्हणाल्या.