बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हंसल मेहता ओळखले जातात. एका अज्ञात कॉलरने फोन करून त्यांना त्रास देत असल्याची तक्रार हंसल मेहता यांनी केली. हंसल मेहता यांनी पोलिसांची मदत घेतली आणि तक्रार दाखल केली. पण पोलिसांची मदत मिळाल्यानंतर त्यांनी ती तक्रार मागे घेतली. नक्की यामागचे कारण काय असा प्रश्न सगळ्यांसमोर असतांना त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

हंसल मेहता यांनी ट्विटरवर ही सगळी घटना सांगितली आणि मुंबई पोलिसांची मदत मागितली. त्यावर मुंबई पोलीस उत्तर देत म्हणाले, तुम्ही पोलिस स्टेशनला जाऊन अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू करू शकतो.

“महाराष्ट्र सरकारला ट्विट केल्यानंतर मी पोलीस तक्रार दाखल केली. काहीच वेळात त्यांनी कॉलरचा तपास लावला. परंतु ज्या व्यक्तीचा तो फोन आहे तो प्रॅंक कॉल करतच नव्हता. त्याचा लहान भाऊ हे करत होता. अल्पवयीन मुलगा फोन नंबर डायल करून मस्करी करत होता. एवढ्या लहान मुलावर काय कारवाई करणार?” असं हंसल मेहता म्हणाल्याचे वृत्त स्पॉट बॉय ईने दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, “तो सारखा माझ्या पत्नीच्या फोनवर फोन करत होता. आम्ही फक्त फोन बंद करू शकतो. पण हा त्यावरचा उपाय नाही. सतत कॉल करणारी व्यक्ती ही स्टॉकर नाही हे आपल्याला कसं समजणार? आपल्याला अशा गोष्टींचा सामना करण्याची गरज आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही.”