प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलेले ट्वीट चर्चेत आहे.

हंसल मेहता यांनी अण्णा हजारेंसाठी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अण्णा हजारे यांचे समर्थन देणं चूक होती असे अप्रत्यक्ष पणे म्हटले आहे. ‘मी ज्या प्रकारे अरविंद यांना पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. मला या गोष्टीचे दु:ख झाले नाही. कारण आपण सर्वजण चूका करतो. मी सुद्धा सिमरन चित्रपट केला’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचा हवाला देत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून शंका उपस्थित करणारे काही प्रश्न विचारले होते.

हंसल मेहता यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. राख, शाहिद, सिटी लाइट्स, अलीगढ़, ओमेर्ता आणि स्कॅम १९९२ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.