सध्या संपूर्ण देश करोना या माहामारीशी लढताना दिसत आहे. अशातच योगगुरु बाबा रामदेव देशवासियांना निरोगी राहण्यासाठी उपदेश देत असतात. त्यांनी पतंजलि औषधे आणि योग करुन करोनावर मात करणे शक्य असल्याचा दावा केला होता. पण आता त्यांनी डॉक्टर आणि अ‍ॅलोपॅथी औषधांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. एकीकडे डॉक्टरांनी बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निशेष केला तर दुसरीकडे अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्वीट करत बाबा रामदेव यांना ‘मूर्ख’ असे म्हटले आहे.

बाबा रामदेव यांनी पत्र लिहित आयएमए आणि फार्मा कंपनीला २५ प्रश्न विचारले होते. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी रामदेव बाबांचे हेच ट्वीट रिट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हा मूर्ख माणूस आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सचा मौल्यवान वेळ वाया घालावत आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे ट्वीट चर्चते आहे. यापूर्वी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री तापसी पन्नूने रामदेव बाबांना सुनावले होते.

आणखी वाचा : ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा

बाबा रामदेव यांनी पत्रामध्ये २५ प्रश्न विचारले होते. सर्वात शेवटी त्यांनी जर अ‍ॅलोपॅथी सर्वगुण संपन्न आहे तर मग अ‍ॅलोपॅथी डॉक्टर हे आजरी का पडतात? असा प्रश्न विचारला होता. तसेच त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील त्या विधानावरुन वाद…

अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा विधानां उल्लेख रामदेव यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये होता. रामदेव यांनी हे विधान मागे घेत असल्याचं सोमवारी जाहीर केलं.