जागतिक संगीत कवेत घेणारे भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचा आज वाढदिवस. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या रेहमान यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात…

१. ६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये रेहमान यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव दिलीप कुमार असे आहे.

२. रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे.

३. रेहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. रेहमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यातला संगीतकार घडला. यातच करिअर करायचे त्यांनी ठरवले आणि ते यशस्वी झाले.

४. १९९२ साली जाहिरातीच्या जिंगलच्या वेगळ्या संगीतावर प्रभावित होऊन मणीरत्नम यांनी रेहमान यांना ‘रोजा’ या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आग्रह केला.

५. सुरुवातीच्या नकारानंतर आईच्या आग्रहास्तव रेहमान यांनी ‘रोजा’ या चित्रपटाला संगीत दिले. पदार्पणातच टवटवीत संगीत देऊन त्यांनी प्रतिभेचा आविष्कार घडवला. ‘रोजा’मध्ये ‘ब्लॅक अँड व्हाईट’ संगीत प्रकार वापरून टवटवीतपणा आणला.

६. २३व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्विकार करत त्यांनी स्वत:चे नाव अल्लाहरखा रेहमान असे नाव ठेवले.

७. ए. आर. रेहमान यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो असे आहे. तर त्यांचे मूळ नाव दिलीप कुमार. त्यांच्या नावाबाबत योगायोग म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नीचे नावही सायरा बानो आहे.

८. रेहमान आपल्या गाण्यांची रेकॉर्डिंग रात्रीच करतात. लता मंगेशकर यांच्यासाठी त्यांनी हा नियम बदललेला. सकाळी आवाजात टवटवीतपणा असतो अशी लताजींची धारणा असल्याने त्यांच्यासोबत रेहमान सकाळीच रेकॉर्डिंग करायचे.

९. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.