बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज ४५ वा वाढदिवस. ‘मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून तिचा बॉलिवूडमध्ये प्रवास सुरू झाला. आज तिचं नाव फक्त बॉलिवूडपुरता मर्यादित राहिलं नसून ती ‘ग्लोबल स्टार’ म्हणूनही ओळखली जाते. आपलं क्षेत्र केवळ बॉलिवूडपुरता मर्यादीत न ठेवता तिनं हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली. तिच्या सौंदर्याचे कोट्यवधी चाहते जगभरात आहेत. अनेक प्रसिद्ध ब्रँडची ती सदिच्छादूत आहे. तिचा मॉडेलिंग क्षेत्रातून सुरू झालेला प्रवास खूप मोठा आहे, या सगळ्या प्रवासात तिचा प्रामाणिकपणा, उत्साह, जिद्द आणि निरागसता हे नेहमीच दिसून येते.

देवदास, हम दिल दे चुके सनम, सरबजित, जोधा अकबर, धूम ,उमराव जान, रावण, सरकार, जज्बा यांसारख्या चित्रपटात तिनं काम केलं. पण याचरोबर तिनं इंग्रजी भाषेतील चित्रपटांतही प्रमुख भूमिका साकारली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेले हे इंग्रजी भाषेतले हे पाच चित्रपट कोणते ते पाहुयात.

ब्राइड आणि प्रेज्युडिस
२००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लग्नाचं वय झालेल्या मुलींसाठी योग्य वर शोधणारे आई बाबा आणि त्यातून होणारी धम्माल ब्राइड आणि प्रेज्युडिस चित्रपटातून पाहायला मिळते. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत नम्रता शिरोडकर, अनुपम खेर प्रमुख भूमिकेत होते.

मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस
२००५ साली प्रदर्शित झालेल्या मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस चित्रपटातही ऐश्वर्याची प्रमुख भूमिका होती. मसाल्यांचं दुकान चालवणाऱ्या तिलोकडे एक दैवी देणगी असते. या दैवी देणगीमुळे माणसांचे स्वभाव तिला पारखता येतात. हा स्वभाव पारखून कोणते मसाले वापरावे याबद्दल ती ग्राहकांना माहिती देते. साधरण या वेगळ्याच कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.

प्रोव्होक
२००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ऐश्वर्यानं एक पंजाबी महिलेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. लग्न करून लंडनला स्थायिक झालेल्या महिलेची, तिला पतीनं दिलेल्या गैरवर्तणुकीची आणि संघर्षाची गोष्ट हा चित्रपट सांगतो.

द लास्ट लिजन
२००७ साली प्रदर्शित झालेल्या द लास्ट लिजन चित्रपटात तिनं काम केलं आहे. हा चित्रपट इटालिअन कादंबरी ‘द लास्ट लिजन’वर आधारित आहे. भारतातील लढवय्या कुटुंबात जन्मलेल्या स्त्रीची भूमिका तिनं यात साकारली आहे. यासाठी तिनं खास मार्शल आर्टस् प्रशिक्षणही घेतलं होतं.

पिंक पँथर २
२००९ साली पिंक पँथर २ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ऐश्वर्यानं या चित्रपटात खलनायिका रंगवली होती.