समीर चंद्रकांत जावळे

‘आज खुश तो बहुत होगे तुम!’ ‘डाॅन का इंतजार तो ग्यारा मुल्कोंकी पुलीस कर रही है’, ‘ आज उतनीभी मेहत्सर नहीं है मै खानेंमे जितनी की हम छोड जाते थे पैमानेमें’ ‘ ऐसा तो आदमी लाईफमें दोईच टाईम भागता है ऑलिम्पिकका रेस हो या पुलीसका केस हो’, ‘विजय दीनानाथ चौहान पुरा नाम’ हे आणि असे अनेक संवाद तुमच्या माझ्या प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत ते फक्त अमिताभ नावाच्या महानायकाने गेल्या चार दशकांपासून अविरतपणे सुरू ठेवलेल्या बच्चनगिरीमुळेच! या महानायकाचा आज वाढदिवस. कुली सिनेमाच्यावेळी पुनित इस्सारची फाईट खरंच बसल्याने अमिताभ मरणाच्या दारातून परत आला.

1969 मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणाऱ्या अमिताभनं आज वयाची पंचहात्तरी ओलांडली आहे. कारकीर्दीच्या सलग 15/16  फ्लॉप  चित्रपट देणारा हा अभिनेता महानायक होईल असं त्या काळी कुणाला वाटलंही नव्हतं. मात्र प्रकाश मेहरांच्या 1972 मध्ये आलेल्या ‘जंजीर’ सिनेमाने जादूच घडवली जणू! या सिनेमात अमिताभने इन्स्पेक्टर विजयची भूमिका ज्या खुबीने साकारली त्याला तोड नाही. ‘अँग्री यंग मॅन’ हे बिरुद त्याला ‘जंजीर’मुळे चिकटलं ते कायमचंच!

अमिताभ सिनेसृष्टीत आला त्या काळातला सुपरस्टार होता राजेश खन्ना. ‘आनंद’ या सिनेमात हे दोघं एकत्र झळकले होते. ‘आनंद’ सिनेमात भाव खाऊन गेला तो अर्थात राजेश खन्ना. पण ‘नमकहराम’ सिनेमा आला आणि हे चित्र टोटल बदललं. आज आणखी एक सुपरस्टार जन्मला असं म्हणत राजेश खन्नाने अमिताभचं कौतुक केलं होतं. पण आपण सुपरस्टार असताना अमिताभ सुपरस्टार झाला ही सल राजेश खन्नाच्या मनात कायमची राहिली. राजेश खन्नाच्या आधीच्या काळात हिरो ही संकल्पना स्टारडम या संकल्पनेपर्यंत किंवा नंबर वन आणि टू पर्यंत पोहचलेली नव्हती. तेव्हाचे कलाकार दिग्गज होते… कारण तो काळ राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंदचा होता. मात्र त्यांच्यात स्पर्धा कधीच नव्हती.

प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’नंतर अमिताभला सूर सापडला… ‘अभिमान’, ‘गहरी चाल’, ‘जमीर’, ‘मिली’, ‘दिवार’, ‘दो अंजाने’, ‘हेराफेरी’, ‘अमर अकबर अँथनी’ या आणि अशा अनेक सिनेमांची रांगच लागली… विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘डॉन’ आणि ‘शोले’ या दोन सिनेमांचा… ‘शोले’तली त्याची जयची भूमिका म्हणजे कारकीर्दीतला माईलस्टोन ठरली. तर ‘डॉन’ को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है… हा डायलॉग अगदी परवा परवा पर्यंत तरूण पिढीच्या तोंडावर होता. ‘आलाप’, ‘चुपके चुपके’, ‘परवरीश’, ‘त्रिशूल’, ‘गंगा की सौगंध’ असे काही वेगळे विषय हाताळणारे चित्रपटही बच्चनसाहेबांनी केले. अमिताभची लार्जर दॅन लाईफ इमेज लोकांना खूप भावली. खरं पाहायला गेलं तर त्याने केलेल्या भूमिकांमधले काही अपवाद सोडले तर तो कायमच आपलासा वाटत राहिला. त्याचमुळे त्याने एक काळ गाजवला किंवा अगदी एक युग गाजवलं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. ७० आणि ८० या कालावधीत जी पिढी होती त्या पिढीचं नेतृत्त्व अमिताभने केलं. अँग्री यंग मॅनची इमेज जपण्यासाठी त्याला याचा फायदाही खूप झाला. जया भादुरी, परवीन बाबी, मोसमी चटर्जी, अरुणा इराणी, विद्या सिन्हा, राखी, रेखा या सगळ्या आघाडीच्या नट्यांसोबत त्याने कामं केली. मात्र त्याची केमिस्ट्री खऱ्या अर्थाने जुळली ती रेखासोबत. मात्र ऑनस्क्रीन केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात येऊ शकली नाही. कारण अभिमान सिनेमाच्या वेळेसच जया भादुरी आणि अमिताभ यांचं लग्न झालेलं होतं. ‘मि. नटवरलाल’, ‘दो अंजाने’, ‘सुहाग’ या सिनेमांमध्ये रेखा आणि अमिताभ यांची जोडी हिट ठरली. मात्र या दोघांचा शेवटचा सिनेमा ठरला तो सिलसिला. या सिनेमानंतर आजतागायत रेखा आणि अमिताभ यांनी सोबत काम केलेलं नाही. एक प्रेमकहाणी कायमची संपताना सिनेसृष्टीने पाहिली. अभिनेत्री परवीन बाबीचं अमिताभवर एकतर्फी प्रेम होतं…  तिनं त्याच्यावर संमोहन करण्याचे आरोपही लावले… मात्र अमिताभनं त्याकडे लक्ष दिलं नाही…ज्येष्ठ दिग्दर्शक ताराचंद बडजादत्या अमिताभला त्यांच्या उंचीवरून आणि आवाजावरून बोलले होते…मात्र त्याने अशी उंची गाठली की ती त्याच्यानंतर कुणालाही गाठता आली नाही आणि त्याच्या खर्जातल्या आवाजाचे तर क्या कहने? अमिताभने ज्या दोन गोष्टी त्याच्या दोष म्हणून दाखवण्यात आल्या होत्या त्याच दोन गोष्टींचं शब्दःश सोनं केलं.

1981 नंतरही अमिताभनं ‘बेमिसाल’, ‘कालिया’, ‘अंधा कानून’, ‘शराबी’, ‘शक्ती’, ‘नमकहलाल’, ‘नमकहराम’, ‘शहेंशहा’ सारखे सिनेमा दिले.. ‘जादूगर’, ‘गंगा जमुना सरस्वती’ सारखे फ्लॉप सिनेमाही केले… त्यानंतर  ‘अग्निपथ’नं त्याच्या कारकिर्दीला नवं वळण दिलं. विजय दीनानाथ चौहान हा त्याचा डायलॉग आजही अनेकांच्या तोंडी अगदी सहज येतो. मात्र या सगळ्या चढत्या आलेखाला ९० च्या दशकात ग्रहणही लागलं होतं. उतरती कळा म्हणतात तसं काहीसं. ऐंशीच्या दशकात म्हणजे साधरण १९८५ नंतर अमिताभने राजकारणातही प्रवेश केला होता. मात्र बोफोर्स प्रकरणात जेव्हा त्याचं नाव आलं तेव्हा त्याने राजकारणाला रामराम ठोकला तो कायमचाच. मात्र इथून महानायकाच्या डाऊनफॉलला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘हम,’ ‘मै आझाद हूँ’, ‘खुदा गवाह’ यासारखे सिनेमा चालले. मात्र ‘इन्सानियत’, अजूबा आजका अर्जुन वगैरे फारशी जादू चालवू शकले नाहीत. लाल बादशहाही अशाच काही सिनेमांमधलं एक उदाहरण.

अमिताभने एबीसीएल नावाची एक कंपनीही स्थापन केली होती. मात्र मृत्यूदाता सिनेमानंतर अमिताभच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली होती… ते वर्ष होतं 1997… अमिताभवर एवढी वाईट वेळ आली होती की त्याला या कंपनीचे शेअर्स विकावे लागले होते… ही कंपनी तोट्यात चालली होती… मात्र यानंतर काही वर्षात अमिताभनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं कौन बनेगा करोडपती म्हणत तो आला. जळून गेलेल्या राखेतून फिनिक्स पक्ष्याने भरारी घ्यावी तसं काहीसं घडलं. अमिताभच्या कारकिर्दीचं दुसरं पर्व सुरु झालं. टीव्हीवर केबीसी हिट झालं आणि अमिताभकडे पुन्हा सिनेमांच्या रांगाच लागल्या. एक काळ असा होता की शाहरुख, आमिर आणि सलमान यांच्यापेक्षा जास्त चित्रपट अमिताभकडे होते. पांढरी फ्रेंच कट दाढी, मृदू हास्य आणि अत्यंत टापटीप असा सूट हा त्याचा केबीसीमधला पेहराव पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळी उंची गाठून देणारा ठरला. ज्यानंतर बच्चनसाहेब वळले ते चरित्र भूमिकांकडे ‘मोहब्बते’, ‘आँखे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘अरमान’, ‘बागबान’, ‘सरकार’, ‘सरकारराज’, ‘भुतनाथ’, ‘खाकी’, ‘देव’, ‘ब्लॅक’, ‘बंटी और बबली’, ‘एकलव्य’, ‘निशब्द’, ‘चीनी कम’, ‘पा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘१०२ नॉट आऊट’ असे एकाहून एक सरस चित्रपट या माणसानं हिंदी सिनेसृष्टीला दिले. ‘बूम’, ‘आग’ यासारखे फ्लॉपही दिले…मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अमिताभ चर्चेत कायम राहिला. आता नागराज मंजुळेसोबत त्याचा ‘झुंड’ नावाचा सिनेमाही येतो आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चनला त्याच्या सिनेसृष्टीतला सर्वात मानाचा समजणारा दादासाहेब फाळके पुरस्कारही जाहीर झाला आहे.  अनेक चढ-उतारांनी भरलेलं आयुष्य, जिवावर बेतलेलं दुखणं, खाकी सिनेमा दरम्यान झालेला अपघात, आयुष्यात केलेली धमाल, अफेअर्स, चुका या सगळ्यांमधून तो उभा राहिला आहे. त्याला मिळालेलं स्टारडम तो नम्रपणे स्वीकारतो आहे. त्याला हे जमू शकतं कारण तो बच्चन आहे. त्याच्या बच्चनगिरीची भुरळ आजही कायम आहे.

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com