‘इशारो इशारो में’ पासून ते ‘कतरा कतरा’पर्यंत असंख्य गाणी अजरामर करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. पडद्यावर हेलनसाठी गायलेलं एखादं गाणं असो किंवा मग शर्मिला टागोरसाठी गायलेलं ‘इशारो इशारो में’ हे गाणं असो प्रत्येक गाण्याला त्यांच्या सुरेल सुरांचा साज चढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कोणतंही गाणं गाण्यासाठी कायम उत्सुक असलेल्या आशा भोसले यांचं व्यक्तीमत्त्वदेखील तितकंच सदाबहार आणि चिरतरुण असल्याचं दिसून येतं.

संगीताचा वारसा मुळातच त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. वडील दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाल्यापासून त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे.

संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या जोडीने केलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांना भूरळ घातली आहे. त्याचसोबत आर.डी. बर्मन यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीत ‘कॅब्रे डान्स’च्या गाण्यांचा पाय थिरकवणारा बाजही आशाताईंनी अप्रतिमरित्या सादर केला. ‘सीआयडी’ चित्रपटातील गाण्यांपासून ते खैय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल चीज क्या है’ या गाण्यापर्यंतचे नाविन्य आशाताईंनी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जपले आहे. ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, ‘कतरा कतरा’ अशी त्यांची कितीतरी गाणी अनेकांच्याच प्लेलिस्टचा भाग आहेत.

चित्रपट गीतांमध्ये असणारी विविधता आणि त्यानुसार आवाजावरचं त्यांचं सामर्थ्य कोणीही नाकारु शकत नाही. चित्रपट संगीत, पॉप संगीत, गझल, भजन, कव्वाली, लोकगीते, भावगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी आशाताईंनी कानसेनांना तृप्त केले आहे. आशाताईंच्या हिंदी गीतांसोबतच त्यांची मराठी गाणीही रसिकांनी नेहमीच पसंत केली आहेत. ‘ऋतु हिरवा’ हा त्यापैकीच एक गाजलेला अल्बम. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘कृष्णधवल’ चित्रपट गीतांपासून ते आताच्या ‘रिमिक्स’ गीतांपर्यंतची आशाताईंची सांगितिक कारकीर्द अनेकांना हेवा वाटेल अशीच आहे.

नौशाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, पंजाबी, तमिळ, उर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. अनेक अभिनेत्रींच्या पडदायावरील सुरेल आवाजामागचं रहस्य म्हणजे आशा भोसले. असे नजाकतीचे सूर आळवणाऱ्या आशाताई आजही तितक्याच हरहुन्नरी आणि उत्साही आहेत.