News Flash

#AshaBhosle : नजाकतीच्या सुरांची स्वर’आशा’..

चिरतरुण व्यक्तिमत्त्वाच्या आशाताईंच्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आशा भोसले

पडद्यावर ‘हेलन’साठी गायलेलं एखादं गाणं असो कींवा मग रफींच्या सुरांना साथ देत शर्मिला टागोरसाठी गायलेलं ‘इशारो इशारो मे’ हे गाणं असो प्रत्येक आभिनेत्रीला ज्या गायिकेच्या आवाजाचा सुरेल साज चढवला जायचा त्या म्हणजे आशा भोसले. गाणे गाण्यासाठी त्या जेवढ्या उत्सुक असतात तितकीच उत्सुकता त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातही दिसून येते. अशा या चिरतरुण व्यक्तिमत्त्वाच्या आशाताईंच्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संगीताचा वारसा मुळातच त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. वडिल दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाल्यापासून त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे.

संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या जोडीने केलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली आहे. त्याचसोबत आर.डी. बर्मन यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीत ‘कॅब्रे डान्स’च्या गाण्यांचा पाय थिरकवणारा बाजही आशाताईंनी अप्रतिमरित्या सादर केला. ‘सीआयडी’ चित्रपटातील गाण्यांपासून ते खैय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल चीज क्या है’ या गाण्यापर्यंतचे नाविन्य आशाताईंनी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जपले आहे. ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, ‘कतरा कतरा’ अशी त्यांची कितीतरी गाणी अनेकांच्याच प्लेलिस्टचा भाग आहेत.

चित्रपट गीतांमध्ये असणारी विविधता आणि त्यानुसार आवाजावरचं त्यांचं सामर्थ्य कोणीही नाकारु शकत नाही. चित्रपट संगीत, पॉप संगीत, गझल, भजन, कव्वाली, लोकगीते, भावगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी आशाताईंनी कानसेनांना तृप्त केले आहे. आशाताईंच्या हिंदी गीतांसोबतच त्यांची मराठी गाणीही रसिकांनी नेहमीच पसंत केली आहेत. ‘ऋतु हिरवा’ हा त्यापैकीच एक गाजलेला अल्बम. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘कृष्णधवल’ चित्रपट गीतांपासून ते आताच्या ‘रिमिक्स’ गीतांपर्यंतची आशाताईंची सांगितिक कारकीर्द अनेकांना हेवा वाटेल अशीच आहे.

नौशाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, पंजाबी, तमिळ, उर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. अनेक अभिनेत्रींच्या पडदायावरील सुरेल आवाजामागचं रहस्य म्हणजे आशा भोसले. असे नजाकतीचे सूर आळवणाऱ्या आशाताई आजही तितक्याच हरहुन्नरी आणि उत्साही आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 11:09 am

Web Title: happy birthday asha bhosale some facts about asha tai
Next Stories
1 प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला बिग बींचा मदतीचा हात
2 चित्र रंजन : भानावर आणणारी गोष्ट
3 चित्र रंजन : युद्ध नसलेली युद्धकथा
Just Now!
X