अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे आज अनेक कलाकार आहेत. मात्र या कलाकारांमध्ये आवर्जुन एक नाव घेतलं जातं ते म्हणजे अभिनेता बोमन इराणी यांचं. हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी यांनी आजवर विविधांगी भूमिका वठविल्या. प्रत्येक भूमिका साकारताना त्यामध्ये समरस होऊन जाणं हे बोमन इराणी यांचं वैशिष्ट. अशाच प्रत्येक भूमिका जगणाऱ्या बोमन इराणी यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण करणाऱ्या बोमन यांचा कलाविश्वातील प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात येण्यापूर्वी ते एका हॉटेलमध्ये काम करत होते.

लहानपणापासून अभिनयाचं स्वप्न उरात बाळगणाऱ्या बोमन यांनी वयाच्या ४० व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हॉटेल स्टाफची नोकरी स्वीकारली. मात्र काही काळानंतर ही नोकरी सोडून त्यांनी आपल्या आईला बेकरी सांभाळण्यास मदत केली. या दरम्यानच त्यांनी १९८१ ते १९८३ याकाळात अभिनयाचे धडे गिरवले. १९८७ मध्ये त्यांनी फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली. फोटोग्राफी करत असतांनाच बोमन यांचा रंगभूमीवर प्रवेश झाला.

दरम्यान, २००० साली राहुल बोस दिग्दर्शित ‘एव्हरीवन सेज आय एम फाइन’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पहिली संधी मिळाली. त्यानंतर २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला.

बोमन इराणी यांचे काही गाजलेले चित्रपट
‘मैं हूं ना’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘दोस्ताना’, ‘खोसला का घोंसला’, ‘वक्त’, ‘नो एंट्री’, ‘थ्री इडियट्स’, ‘वीर-झारा’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’, ‘लक्ष्य’, ‘हनिमून ट्रॅवल्स प्रा. लि. सॉरी भाई’, ‘पेज-३’ ,’माय वाइफ्ज मर्डर’, ‘फरारी की सवारी’. तर मराठीतील ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेमुळे त्यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं.