बॉलिवूड अभिनेते, निर्माते, लेखक दिलीप कुमार यांचा आज ९५ वा वाढदिवस. ११ डिसेंबर १९२२ मध्ये पाकिस्तानच्या पेशावर येथील ख्वानी बाजार म्हणजे आत्ताचा खैबर पख्तूनख्वा भागात जन्म झाला. दिलीप कुमार यांच्या वडिलांचे नाव अघाजी होते. ते व्यवसायाने जमीनदार आणि फळांचे व्यापारी होते. दिलीप यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांनी नाशिक येथील बार्नस शाळेतून शिक्षण घेतले. शोमन नावाने प्रसिद्ध असलेले राज कपूर आणि दिलीप कुमार हे बालमित्र आहेत. १९३० मध्ये दिलीप कुमार यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत चेंबूर येथे स्थायिक झाले.

दिलीप कुमार यांचे हिंदी सिनेसृष्टीत एक खास स्थान आहे. वास्तवाच्या जवळ नेणारा अभिनेता अशी त्यांची ओळख आहे. दिलीप साहेब याच नावाने ते जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांना त्यांच्या काळातील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखले जायचे. एवढेच काय तर सत्यजीत रे यांनी ‘अल्टिमेट मेथड अॅक्टर’ अशी उपाधीही त्यांना दिली होती. त्यांनी १९४४ मध्ये आलेला ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्याशी निगडीत घटनांवर प्रकाश टाकणार आहोत.

पाकिस्तानशी संबंध असलेले दिलीप कुमार हे पहिले बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहेत. त्यांना दिलीप हे नाव देविका राणी यांनी दिले होते.
दिलीप कुमार यांना बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग नावाने ओळखले जायचे.

अशोक कुमार यांच्या रूपात दिलीप साहेबांना त्यांचा मार्गदर्शक सापडला होता. त्यांना ज्वार भाटा हा पहिला सिनेमाही अशोक कुमार यांच्या सांगण्यावरूनच मिळाला होता.

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या लग्नातील एक दुर्मिळ फोटो

१९४७ मध्ये आलेल्या जुगनू या सिनेमाने दिलीप कुमार यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. या सिनेमाच्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर सलग ६ दशकं त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर एकहाती राज्य केलं.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळवणारे ते पहिले कलाकार होते. यानंतर त्यांना ८ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९६६ मध्ये ४४ व्या वर्षी दिलीप कुमार यांनी २२ वर्षीय अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी विवाह केला. त्यानंतर १९८० मध्ये हैदराबादमधील आसमा या मुलीशी त्यांनी दुसरा विवाह केला. पण त्यांचे हे दुसरे लग्न फार काळ टिकू शकले नाही.