टीव्हीवर सर्वात जास्त टीआरपी कमावणारा कोणता कार्यक्रम असेल तर तो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा आहे. या मालिकेमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच उत्तमरित्या मनोरंजन केलं. त्यातीलच दयाबेनने तर ‘हे मा माताजी’ म्हणतं प्रेक्षकांना खळखळून हसविलं. याच दयाबेनचा अर्थात दिशा वकानीचा आज वाढदिवस.

दिशाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मुळे वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेत तिने केलेल्या अभिनयामुळे बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटीही तिचे चाहते झाले आहेत. या चाहत्यांमध्ये सलमान खानचं नाव आवर्जुन घेतलं जातं. १७ सप्टेंबर १९७८ साली गुजरातमध्ये जन्मलेल्या दिशाने तिच्या करिअरची सुरुवात बी ग्रेड चित्रपटांपासून केली आहे. १९९७ मध्ये ‘कमसिन: द अनटच्ड’ सारख्या बी-ग्रेड चित्रपटामध्ये तिने काम केले होते. या चित्रपटानंतर तीने काही नावाजलेल्या चित्रपटांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या.

दिशा २००८ पासून सब टीव्हीच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय ‘खिचडी’ (२००४) आणि ‘इंस्टेंट खिचडी’ (२००५) या मालिकांमधून ती छोट्या पडद्यावर दिसली आहे. दिशाने आतापर्यंत १० पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत. याशिवाय, बॉलिवूडच्या ‘कमसिन : द अनटच्ड’ (१९९७), ‘फूल और आग’ (१९९९), ‘देवदास’ (२००२), ‘मंगल पांडे : द राइजिंग’ (२००५), ‘सी कंपनी’ (२००८) आणि ‘जोधा अकबर’ (२००८) या चित्रपटांमध्येही तिने काम केले होते.

दरम्यान, दिशाने ही मालिका सुरु असतानाच २०१५ मध्ये चार्टड अकाऊंटंट मयुर परीहाबरोबर लग्न केलं. या दोघांना एक मुलगी असून ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईतील पवई येथे दिशाचा मुलीचा जन्म झाला आहे.