बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लव्ह स्टोरीपासून ते लग्नापर्यंतचा सारा प्रवास चाहत्यांना माहित आहे. परंतु त्याकाळी बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होते, ज्यांना हेमा मालिनींसोबत लग्न करायचे होते. त्यातीलच दोन अभिनेता असे आहेत जे त्याकाळी आघाडीच्या कलाकारांपैकी होते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते जितेंद्र आणि संजीव कुमार यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं.

संजीव यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते म्हणून त्यांनी जितेंद्र यांची मदत घ्यायचे ठरवले. संजय यांनी जितेंद्रला त्यांच्या मनातील गोष्ट हेमापर्यंत पोहोचवायला सांगितले. पण तेव्हा हेमा यांनी संजीव यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. असे म्हटलं जातं की, हेमा यांनी संजीव यांना लग्नासाठी नकार दिला असला तरी त्यांना जितेंद्र आवडू लागले होते. जितेंद्र आणि हेमा यांनी ‘दुल्हन’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांच्या घरातल्यांनीही लग्नासाठी परवानगी दिली होती. जितेंद्र यांना हेमाशी लग्न करण्याची इच्छा तर होती पण तेव्हा ते शोभा यांना डेट करत होते.

शोभा आणि जितेंद्र हे लहानपणीपासूनचे मित्र होते. शोभा यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी हेमा यांना जितेंद्र यांना समजाविण्यास सांगितले. पण यादरम्यान हेमा आणि जितेंद्र यांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. एकीकडे दोन कुटुंब एकमेकांना भेटत असताना हेमा यांना धर्मेंद्र यांचा फोन आला आणि त्यांनी हेमा मालिनीसाठीचे आपले प्रेम व्यक्त केले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी हेमा यांना एकदा भेटायला सांगितले.

असे म्हटले जाते की, धर्मेंद्र यांची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट देण्यास तयार नव्हती म्हणून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. हेमा यांचे वडील व्ही. एस रामानुजम चक्रवर्ती यांचा या लग्नाला विरोध होता. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना आधीच चार मुले होती. म्हणून रामानुजम यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता.

वडिलांच्या निधनानंतरच धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले. या लग्नाला हेमा यांच्या आईचाही विरोध होता पण तरीही त्यांनी लग्न केले. हेमा यांच्या मते, धर्मेंद्र यांच्याकडे आकर्षित होण्याचे मुख्य कारण त्यांचा स्वभाव होता. धर्मेंद्र हे त्यांच्या आईसारखेत शांत आणि कणखर आहेत. हेमा आणि धर्मेंद्र यांना इशा आणि आहाना या दोन मुली असून दोघींचीही लग्न झाली आहेत.