उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. बॉलिवूडमधील बार्बी गर्ल या नावाने लोकप्रिय असलेल्या कतरिनाने कमी कालावधीत कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. आज कतरिनाचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिच्याविषयी चाहत्यांना माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावत होती. त्यासोबतच तिने अनेक तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं होतं. विशेष म्हणजे लंडनमधील एका शो दरम्यान दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कतरिनाला पाहिलं आणि तेथेच त्यांनी तिला ‘बूम’ या चित्रटाची ऑफर दिली. खरंतर कतरिनासाठी ही फार मोठी संधी होती, मात्र २००३ साली प्रदर्शित झालेला ‘बूम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही गाजला नाही.


कतरिना कैफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या आडनावाविषयी फार कमी जणांना माहित आहे. कैफ हे कतरिनाच्या वडिलांचं आडनाव असलं तरीदेखील कतरिना प्रथम आईच्या आडनावामुळे ओळखली जायची. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना तिचं आडनाव ‘टरकोट’ असं लावायची. मात्र हे आडनाव उच्चारण्यास कठीण असल्यामुळे तिने ते बदलून वडिलांचं कैफ हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे कतरिना टरकोटची, कतरिना कैफ झाली.

दरम्यान,कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. कतरिनाच्या तीन मोठ्या बहिणींची नावे स्टेफनी, ख्रिस्टीन आणि नताशा असून मेलिसा, सोनिया आणि इसाबेल छोट्या बहिणींची नावे आहेत. तिच्या भावाचे नाव मायकल असे आहे. तिची बहिण इसाबेल कैफसुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-बाबांचा घटस्फोट झाला आणि तिचे बाबा युएसला गेले. त्यामुळे लहानपणापासून आईनेच सर्वांचे संगोपन केल्याचे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.