बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. आज तिचा वाढदिवस आहे. कतरिनाचे तुम्ही चाहते आहात का? जर असाल तर तिच्याबद्दल अनेक लहानमोठ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा.

बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. त्याचबरोबर तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली. किशोरवयात कतरिनाला पहिली मॉडेलिंग असाइनमेंट मिळाली.

लंडनमधल्या एका शोदरम्यान दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कतरिनाला पाहिले आणि ‘बूम’ या चित्रपटात अभिनेत्री म्हणून तिला लाँच केले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. या चित्रपटासाठी कतरिना पहिल्यांदा भारतात आली आणि तिने आपले आडनाव बदलले. उच्चारासाठी कठीण असल्याने कतरिनाने आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला. कतरिना आधी टरकोट हे आईचं आडनाव लावायची. ते बदलून तिने नंतर वडिलांचे आडनाव नावापुढे लावण्यास सुरुवात केली. आज कतरिना कैफ हे नाव बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध आहे.

https://www.instagram.com/p/BTvaqPBgIot/

कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. कतरिनाच्या तीन मोठ्या बहिणींची नावे स्टेफनी, ख्रिस्टीन आणि नताशा असून मेलिसा, सोनिया आणि इसाबेल छोट्या बहिणींची नावे आहेत. तिच्या भावाचे नाव मायकल असे आहे. तिची बहिण इसाबेल कैफसुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
कतरिना लहान असतानाच तिच्या आई-बाबांचा घटस्फोट झाला आणि तिचे बाबा युएसला गेले. त्यामुळे लहानपणापासून आईनेच सर्वांचे संगोपन केल्याचे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘माझ्या मित्रमैत्रिणींचे वडील त्यांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे असताना पाहते तेव्हा मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. तक्रार करण्याऐवजी मला माझ्या आयुष्यात जे काही मिळाले त्यासाठी मी आभारी असायला हवं.’

https://www.instagram.com/p/BUFGJ_vAZ4Z/

२००९ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना म्हणालेली की, ‘मी वडिलांच्या संपर्कात नाही. माझ्या आईने सामाजिक कार्यासाठी स्वत:चे आयुष्य वाहून घेतल्याने त्यासाठी आम्हाला अनेक देशांमध्ये फिरावे लागत असे. हाँग काँगमध्ये माझा जन्म झाला, त्यानंतर चीन, जपान, नंतर जपानमधून बोटीने फ्रान्स, फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड येथे राहिलो. काही युरोपीयन शहरांची मी अजून नावे नाही घेतली कारण आम्ही काही महिन्यांसाठीच तिथे राहिलो. त्यानंतर पोलंड, बेल्जियम, हवाई आणि मग लंडन येथे आलो.’

https://www.instagram.com/p/BVJpXbRgHbB/

अनेकदा स्थलांतर करावे लागल्याने कतरिना आणि तिच्या बहिणींनी घरीच शिक्षण घेतले. लंडनमध्ये कतरिना राहत असल्याची जरी सर्वांना माहित असली तरी भारतात येण्याच्या फक्त तीन वर्षांआधीच ती तिथे राहायला गेली होती.