हिंदी चित्रपट सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता, अतरंगी गायक म्हणून ख्याती असणाऱ्या किशोर कुमार यांच्या आज त्यांच्या वाढदिवशी चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून आठवणी जागविल्या जात आहे. चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली. हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत. के. एल. सैगल यांना प्रेरणास्त्रोत मानणाऱ्या किशोर कुमार यांच्या गायक होण्याला त्यांचे जेष्ठ बंधू आणि अभिनेते अशोक कुमार यांचा विरोध होता. कोणतीही रितसर तालीम न घेतल्यामुळे किशोर कुमार यांना तत्कालीन प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मुकेश यांच्या गर्दीत तग धरणे शक्य होणार नाही अशी अशोक कुमार यांची धारणा होती. पण शेवटी गायन क्षेत्रात पदार्पण करत किशोर कुमारांनी हे क्षात्र गाजवत आजवर अनेक गाण्यांचा खजिना चित्रपटसृष्टीला दिला आहे.
आभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार यांनी अभिनयासोबतच ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘ओ हंसीनी मेरी हंसीनी’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशी कितीतरी सुपरहिट गाणी गात रसिकांच्या मनावर राज्य केले. आजच्या तरुणाईच्या प्लेलिस्टमध्येही ‘किशोर दां’ना पसंती दिली जाते. बॉलिवूडमधील अनेक नायकांना आवाज देत किशोर कुमार यांनी गायलेली गाणी त्यांच्या खास गायनशैलीसाठीही बरीच गाजली. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी किशोर कुमार यांना आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरविण्यात आले. अशा या धम्माल गायकाच्या वाढदिवशी कलाविश्व आणि नेटिझन्सही किशोर कुमारांच्या आठवणी जागवण्यात रमले आहेत. #किशोर कुमारच्या ट्रेंडला आज ट्विटरवर उधआण आले आहे.