मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मांदियाळीमध्ये एक नावाजलेलं नाव म्हणजे प्रिया बापट. उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्रियाचा आज वाढदिवस.२००० साली आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटातून कलाविश्वामध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियाने आज चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:च एक ठसा उमटविला आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिच्याकडे चित्रपटसृष्टीमध्ये एक गुणी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं.

१८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये जन्म झालेल्या प्रियाने प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘आनंदी आनंद’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा नवा ठसा उमटविला. त्याप्रमाणेच ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटामध्ये प्रभावीपणे काम करुन तिने तिच्यातील अभिनयाची एक वेगळी झलकही दाखवून दिली. इतकंच नाही तर ‘वजनदार’, ‘आम्ही दोघी’, ‘हॅपी जर्नी’, ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिकाही विशेष गाजल्या.

मराठी चित्रपटांप्रमाणेच प्रियाने ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटामध्येही छोटेखानी भूमिका पार पाडली आहे. त्यानंतर ‘अधुरी एक कहाणी’ आणि मग झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ मध्ये केलेल्या निवेदिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. तसंच ‘नवा गडी.. नवं राज्य’ या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली आहे.