काही कलाकारांच्या बाबतीत त्यांच्या कलेपेक्षा नावालाच जास्त महत्त्व दिलं जातं. अर्थात त्यात कलाही तितकीच महत्त्वाची असते. पण, ‘बस नाम ही काफी है…’ असं काही म्हणतात ना, ते अशा कलाकारांना पूर्णपणे लागू होतं. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता प्रभास. एस.एस.राजामौली यांनी ‘बाहुबली’ चित्रपटाच्या माध्यमातून या अभिनेत्याला एक वेगळीच ओळख दिली आणि पाहता पाहता तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत होऊन बसला.

प्रभासचं बोलण, हसणं, त्याची अभिनय शैली, पीळदार शरीरयष्टी या साऱ्या गोष्टींमुळे अनेकजणींचं भान हरपून गेलं होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का, अभिनय क्षेत्रात नावारुपास आलेला हा अभिनेता एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न पाहात होता. थक्क होण्याची गरज नाही. कारण, प्रभासच्या आयुष्याशी निगडीत आणखीही काही गोष्टी आहेत, ज्याविषयी फारशी चर्चा झाली नाही.

प्रभास या नावाने तो ओळखला जात असला तरीही त्याचं खरं नाव आहे, व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती. दाक्षिणत्य अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासने ‘अॅक्शन जॅक्सन’ या हिंदी चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. विविध चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिकणाऱ्या या अभिनेत्याचा मेणाचा पुतळाही बॅंकॉकच्या मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला आहे. ‘अमरेंद्र बाहुबली’च्याच रुपात हा पुतळा साकारण्यात आला आहे.

अभिनय आणि एकंदर चित्रपटसृष्टीशी प्रभासचं तसं जवळचं नातं. त्याचे वडील, सुर्यनारायण राजू चित्रपट निर्माते आहेत. तर काका कृष्णम राजू प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते आहेत. पण, अभिनय क्षेत्रात करिअर करणं ही काही प्रभासची पहिली पसंती नव्हती. तो सुरुवातीला हॉटेल व्यवसायात उतरण्याची म्हणजेच ‘हॉटेलियर’ होण्याची स्वप्न पाहत होता. पण, सरतेशेवटी त्याच्या करिअरची गाडी अभिनयाच्या स्थानकावर येऊन थांबली.

प्रभास हाडाचा कलाकार आहे त्याप्रमाणेच तो एक अफलातून खवैय्याही आहे. मुख्य म्हणजे आपल्या सहकलाकारांनी चमचमीत घरचं खाणं खाऊ घालणंसुद्धा त्याला फार आवडतं. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘इन्स्टा स्टोरी’मध्ये पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये आगामी ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवर प्रभासने तिच्यासाठी खास हैद्राबादी पद्धतीच्या जेवणाचं आयोजन केलं होतं. तो स्वत: खवैय्या असून, मांसाहारी पदार्थ त्याला खास आवडतात. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रभासने हॉलिवूडमधील एका बड्या व्यकीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे, रॉबर्ट डी नीरो.

प्रभास त्याच्या कामाप्रती फार समर्पक आहे याचा प्रत्यय ‘बाहुबली’ चित्रपटाच्या वेळी आला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांचं चित्रीकरण होईपर्यंत त्याने कोणत्याच दुसऱ्या चित्रपटाचं काम हाती घेतलं नव्हतं. किंबहुना या भव्य चित्रपटाला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी त्याने खासगी आयुष्यही दूर सारलं होतं.