तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकल असं अभिनेता रणबीर सिंगबद्दल नक्कीच म्हणता येईल. सध्या बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर रणवीर आहे. ‘बँड बाजा बरात’ चित्रपटापासून रणवीरचा बॉलिवूडमधला प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘लुटेरा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ ‘राम-लीला’ यांसारखे अनेक हिट चित्रपट रणवीरनं दिले. आता भन्साळी बॅनर अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात रणवीरला प्राधान्य असतं. मात्र याच रणवीरला दिग्दर्शक करण जोहरनंही कोणे एकेकाळी नाकारलं होतं.
#HappyBirthdayRanveerSingh : बॉलिवूडचा ‘अतरंगी’ अभिनेता
काही दिवसांपूर्वी हा किस्सा रणवीर आणि करणनं चाहत्यांना सांगितला होता. आदित्य चोप्रानं ‘बँड बाजा बरात’ चित्रपटात रणवीरला घेण्याचं ठरवलं होतं. करण जेव्हा रणवीरला प्रत्यक्षात भेटला तेव्हा मात्र त्याला रणवीर अजिबातच आवडला नाही. इतकंच नाही तर आदित्यानं रणवीरला चित्रपटात घेण्याबाबत पुन्हा विचार करावा असा सल्लाही करणनं आदित्यला दिला असल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या, अनेक इंग्रजी वेबसाईटनं याला दुजोराही दिला होता. मात्र करणच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आदित्य चोप्रानं हा चित्रपट तयार केला. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला.
#HappyBirthdayRanveerSingh : रणवीर सिंगबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
‘तू काही फारसा सुंदर दिसत नाहीस, त्यामुळे तुला इथे तग धरायचा असेल आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर तुला खरंच खूपच चांगला अभिनय करावा लागणार आहे’ असा सल्ला या चित्रपटाच्या सुरूवातीलाच आदित्य चोप्रानं रणवीरला दिला होता आणि हा मोलाचा लक्षात ठेवून रणवीरनं नेहमीच आपल्या लूकपेक्षा अभिनयाला प्राधान्य दिलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 1:08 pm