बॉलिवूडचा ‘बादशहा’ अर्थात शाहरुख खानचं नाव सध्या ट्विटरच्या ट्रेंडिंग यादीत अग्रस्थानी आहे. यामागचं कारण म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे. ‘किंग ऑफ रोमॅन्स’ म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुखची रिअल लाइफ प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाइतकीच रंजक आहे.

शाहरुख-गौरीची पहिली भेट
दिल्लीत राहणाऱ्या शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती. त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.

जेव्हा गौरीने केला होता ब्रेकअप
शाहरुख खान सुरुवातीला गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. तिने दुसऱ्या मुलांशी बोलणं, केस मोकळे सोडणं त्याला आवडायचं नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तो गौरीशी भांडू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या गौरीने त्याच्याशी अबोला धरला आणि काही दिवसांसाठी मैत्रिणींसोबत ती दिल्लीहून मुंबईला आली. शाहरुखला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा गौरीसाठी तोसुद्धा मुंबईला आला. मुंबईतल्या अक्सा बीचवर पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी दोघांनाही रडू कोसळलं. त्याच वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

२६ वर्षांपासून शाहरुख- गौरी एकत्र
शाहरुख आणि गौरी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकीनऊ आलं होतं. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवलं. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. २६ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचं कोर्टात लग्न झालं. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं.

१९९७ मध्ये गौरीने आर्यनला जन्म दिला आणि त्यानंतर २००० मध्ये शाहरुख- गौरीच्या आयुष्यात सुहानाचं आगमन झालं. जुलै २०१३ मध्ये सरोगसीद्वारे अबरामचा जन्म झाला. २६ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात दोघांनी बरेच चढउतार पाहिले, मात्र त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.