News Flash

चित्र  रंजन : तरीही ‘हॅप्पी’ नाहीच!

‘हॅप्पी भाग जाएगी’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा तो अनपेक्षितरीत्या सुखद धक्का देणारा ठरला होता.

(संग्रहित छायाचित्र)

हॅप्पी फिर भाग जाएगी

‘हॅप्पी भाग जाएगी’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा तो अनपेक्षितरीत्या सुखद धक्का देणारा ठरला होता. आपल्याच लग्नातून पळालेली हॅप्पी चुकून पाकिस्तानमध्ये पोहोचते. तिथून तिचा पुन्हा मायदेशापर्यंतचा प्रवास तिच्याबरोबर आणखी काहीजणांना थकवणारा आणि प्रेक्षकांना हसवणारा होता. यावेळी हॅप्पी पळालेली नाही, ती तिच्या निश्चित ठिकाणी उतरली आहे. मात्र तिला आधीची हॅप्पी समजून जो गोंधळ घातला गेला आहे तो मध्ये मध्ये हसवणारा असला तरी मुळातच सगळी कथा ओढूनताणून रचल्यासारखी वाटते. त्यामुळे ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’मध्ये ना धड कथा आहे, ना त्या ताकदीच्या व्यक्तिरेखा. त्यातल्या त्यात आधीच्याच बग्गा आणि उस्मान आफ्रिदीची जोडगोळी चित्रपटात गंमत आणते.

अमृतसरहून चीनमध्ये पोहोचलेली हरप्रीत ऊर्फ हॅप्पी (सोनाक्षी सिन्हा) विद्यापीठात आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी भलत्याच गुंत्यात सापडते. तिला पाकिस्तानमध्ये हरवलेली ‘हॅप्पी’ समजून चँग नावाचा चिनी गुंड आणि त्याचे सहकारी तिचे अपहरण करतात. तुम्ही ज्या ‘हॅप्पी’चा शोध घेताय ती मी नाही.. हे सांगून थकलेल्या हॅप्पीजवळ पळण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच वेळी मूळची हॅप्पी तिच्या नवऱ्यासोबत चीनमध्येच भटकंती करत असते. आपल्या मागे लागलेल्या लोकांपासून सुटका व्हावी म्हणून हॅप्पी चीनमध्ये एका बारमध्ये भेटलेल्या खुशवंत गिलकडे (जस्सी गिल) मदत मागते. तोवर चँगने आधीच्या हॅप्पीची मायदेशी सुटका करणारा पाकिस्तानी पोलीस अधिकारी उस्मान (पियूष मिश्रा) आणि हॅप्पी ज्याच्याशी लग्न मोडून पळते तो बग्गा (जिमी शेरगिल) यांचेही अपहरण करून त्यांना चीनमध्ये घेऊन येतो. इथून पुढे एका हॅप्पीची सुटका करण्यासाठी दुसऱ्या हॅप्पीचा शोध असा प्रवास सुरू होतो किंवा तो तसाच व्हायला हवा होता. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध नव्या हॅप्पीची व्यक्तिरेखा बसवण्यातच खर्ची पडला आहे. तिचा इतिहास आणि तिचा वर्तमान जाणून घेतल्यानंतर मग ही चौकडी जमून येते. आधीच्या चित्रपटातला विनोद हा बराचसा हॅप्पीवर ओढवलेल्या परिस्थितीतून निर्माण झालेला होता. इथे हॅप्पीची गोष्ट पुढे नेण्यासाठी विनोदी व्यक्तिरेखांची फौजच उभी करण्याचा दिग्दर्शक मुदस्सर अली यांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

चीनमध्ये अस्खलित हिंदी बोलणारा चँग नावाचा गुंड, खुशवंत ज्यांची मदत मागतो तो चिनी दिसणारा पाकिस्तानी गृहस्थ, फा क्यू नावाचा खुशवंतचा आणखी एक मित्र अशा व्यक्तिरेखा उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्या मुळातच तकलादू आहेत आणि विनोदनिर्मिती करण्यापलीकडे त्यांना फारसे काम नाही. काही मोजके संवाद वगळता चिनी-हिंदी भाई भाई प्रकरणही तिथे नावापुरतेच उरते. सोनाक्षी सिन्हाने तिच्या यथामतीप्रमाणे ही हॅप्पी पेलली आहे, पण तिच्या व्यक्तिरेखेच्या मांडणीतच गोंधळ असल्याने तिचा हवा तसा प्रभाव पडत नाही. त्यातल्या त्यात बग्गा आणि आफ्रिदीच्या भूमिकेत अभिनेता जिमी शेरगिल आणि पियूष मिश्रा ही जोडगोळी भाव खाऊन गेली आहे. या दोन कलाकारांचा सहज अभिनय आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकपणे हसू आणतो. खुशवंतसिंगच्या भूमिकेसाठी पॉप गायक जस्सी गिलची वर्णी लावली आहे. सोनाक्षीचा नायक म्हणून तो कुठेही ठाव घेत नाही. किंबहुना त्यामुळेच ही जोडी ना रोमँटिक ठरत ना हसू आणणारी.. मध्यवर्ती जोडीच फसवी असल्याने हिंदी आणि चिनी यांच्यातला विसंवाद, काही परिस्थितीजन्य विनोद असे तुकडे तुकडे जोडत चित्रपट तुम्हाला हसवतो. डायना पेंटी आणि अली फजल ही आधीच्या चित्रपटातील हॅप्पी आणि गुड्डूची जोडीही चित्रपटात नावापुरतीच येते. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात जे यश दिग्दर्शक म्हणून मुदस्सर अली यांना साधले तेच त्याच्या सिक्वलच्या प्रयत्नात पुरते फसले आहे. आधीच्या चित्रपटाच्या यशाच्या जोरावर मांडलेला हा सिक्वलचा खेळ विनोदी असला, हसवणारा असला तरी अगदी हॅप्पी हॅप्पी ठरत नाही.

* दिग्दर्शक – मुदस्सर अली

* कलाकार – सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल, जस्सी गिल, पियूष मिश्रा, डायना पेंटी, अली फजल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:47 am

Web Title: happy phirr bhag jayegi review by reshma raikwar
Next Stories
1 खंदा कलाकार..
2 अखेर नेहा धुपियाबाबतची ती चर्चा ठरली खरी
3 धोनीसोबत डिनरला जाणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी
Just Now!
X