तिच्या नुसत्या आवाजातूनच तिच्यातली एनर्जी जाणवत राहाते. तिचं ते वेगाने बोलणं, कनेक्ट होणं, मनमोकळा संवाद आणि तरीही ठाम, बिनधास्त मतं.. त्या आवेगातही न सुटलेलं भान.. ‘ती’ नव्या पिढीची प्रतिनिधी. जीवनातला वेग आणि त्यात निसटलेल्या काही गोष्टी याविषयी सांगतेय ‘मुंबई की रानी’ अर्थात प्रसिद्ध आरजे मलिष्का.

आयुष्याचा वेग वाढलाय.. खरंय. वेग हेच आजच्या तरुणाईचं प्रतीक बनलंय. खाणं- पिणं- करमणूक- रिलेशनशिप- ब्रेकअप सगळं कसं इन्स्टंट झालंय. जीवनात, राहणीमानात हा वेग कितपत महत्त्वाचा? माझेच काही अनुभव शेअर करते. एक काळ असा होता की, चार-चार दिवस सलग मी काम करत राहायचे. ऑफिस आणि घर या दोनच ठिकाणी वावर होता तेव्हा. इतर कोणतंही वेगळेपण नव्हतं आयुष्यात. तेव्हा मला भान आलं की, हेच आहे का आयुष्य? काम आणि घर पुन्हा काम यातच आहे का माझं विश्व? पण त्यातूनही मी स्वत:ला सावरत दिलासा दिला की, माझ्याही जीवनाला वेग मिळणार आहे हे नक्कीच आणि तो मिळालाही. पण हे सगळं झपाटय़ाने बदलतंय हे खरंय. याच वेगवान विश्वात वावरत असताना, आपलं राहणीमान, आपल्या आवडी-निवडी, आपल्या प्रायॉरिटी सातत्याने बदलत असतात. खरंय ना? पण हा चंचलपणा आहे, असं मी नाही म्हणणार. ही या काळाची गरज आहे. आयुष्याच्या या वेगामुळेच आजच्या पिढीला वयाचं भानही उरलेलं नाही. या अनस्टॉपेबल लाइफला एकाएकी असा काही वेग येतो की, तुम्ही स्वत:लाही त्यात विसरून जाता. पण हेच युथफूलनेसचं लक्षण आहे. हा वेग म्हणजेच तारुण्य आहे. या वेगामुळेच तुम्ही चिरतरुण राहू शकता.. मनाने.

अशा या वेगवान अयुष्यात थोडय़ा प्रमाणात मी जर काही हरवून बसले असेन तर ती आहे माझी झोप. रेडिओ शो, टीव्ही शूट्स, कॉन्सर्ट्स अशा शेकडो कामांच्या व्यवधानामध्ये दिवसभर व्यग्र असल्यामुळे मी निवांत झोपेला थोडी दुरावलेय आणि त्याची निश्चितच खंत आहे. आय अ‍ॅम शुअर.. हे अनेकांसोबतही होत असावं. या धावपळीत कधी कधी आरोग्याकडेही दुर्लक्ष होतं. माझ्याकडूनही झालं अनेकदा. पण तेच सावरताना पुन्हा एकवार आयुष्याला वेग मिळाला. या वेगातून मिळणारी एनर्जी आता स्वत:च्या कामांत, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आणि स्वत:ला एनर्जेटिक ठेवण्यासाठी कामी येतेय.

आजची तरुणाई फार झपाटय़ाने बदलत आहे, काही तरी नवं जाणून घ्यायला, नवीन प्रयोग करायला आज वयाची अट राहिलीच नाही. त्यामुळे भारतासारख्या तरुण देशात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या तरुणाईवर इतका भर दिला जातोय. मी आतापर्यंत अशा कित्येक तरुण कलाकार, उद्योजक किंवा काही तरी नवं करू पाहणाऱ्या मित्रमैत्रिणींना भेटलेय ज्यांनी अगदी कमी वयात नव्या गोष्टींचा शोध लावला आहे, कलेत नावीन्य आणलं आहे, नवीन मशीनरी बाजारात आणली आहेत, नवीन बिझनेस सुरू केला आहे. कोणत्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायची याचा विचार करणाच्या वयात ही तरुण मंडळी स्वत:चं अस्तित्व स्वत: उभं करत आहेत. ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. या सर्व वेगवान बदलांचं एक कारण आहे सोशल नेटवर्किंग साइट्स, इंटरनेटची उपलब्धता आणि त्याचा वाढलेला वेग. केवळ आचार- विचारातच नाही तर जन्मापासून ऐकलेल्या भाषेवरही या इंटरनेटच्या वेगानं वेगळे संस्कार केले. भाषेतही अनपेक्षित बदल होऊन आता ऑनलाइन चॅटिंगसाठीची नवीन शॉर्टकट भाषा निर्माण झालीय. तरुणाई ती सर्रास वापरते. पण ती भाषा अभिजात नाही, याचीही या तरुणाईला जाणीव आहे. ती भाषा गरजेतून निर्माण झालीय.. वेगवान संवादाच्या गरजेतून. या एकंदर वेगाचा आणि आयुष्यातल्या मूल्यांचा अचूक समतोल राखण्याचं कसब आजच्या तरुण पिढीत निश्चित आहे.

वाचा : सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी ‘ती’ 

आजचे सिनेमेच बघा ना! आजचा सिनेमा किती वेगळा आहे. तरुणाईवर छाप पाडणारं सिनेमा हे एक प्रबळ माध्यम. गेल्या जमान्यातले फॅमिली ड्रामा, सच्चा प्यार, संस्कार, लयबद्ध संगीत आजही दिसतात पण त्यात बरीच प्रॅक्टिकॅलिटी आली आहे. सहजता आली आहे. अभिनिवेश बाजूला जातोय. म्हणजेच आजच्या तरुणाईने आपल्या सिनेमांतूनही जुन्या-नव्याचा सुरेख सुवर्णमध्य साधला आहे.

या युथफूल जमान्यात युथफूल राहण्याचा माझा फंडा म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रसंग, व्यक्ती, सल्ला या साऱ्यांचा रिलेव्हन्स ठेवणं. त्यांच्यासोबत स्वत:ला जुळवून पाहणं फार महत्त्वाचं, जे कधी कधी मला कठीण जातं. मैत्रीच्या नात्याने माणसं जोडायला नेहमीच मी प्राधान्य दिलंय. मला लहानपणापासून इन्स्पिरेशनल व्हायचं होतं. आयुष्यातल्या वेगामुळे मीच इन्स्पायर झालेय आणि आता माझ्या कामानं कुणी तरी इन्स्पायर होतंय, हे ऐकताना फार बरं वाटतं. रेडिओ हे असं माध्यम आहे, जिथे तुमचा चेहरा दिसत नाही. तुमचे अनुभव तुम्ही लपवून ठेवू शकता किंवा बिनधास्त शेअर करू शकता. तुम्हाला स्वातंत्र्य असतं, पण अनुभव जाहीरपणे वाटण्याकडे माझा कल आहे. हेच कदाचित तरुणाईला क्लिक होत असावं. हे असं इन्स्टंट शेअरिंग, उत्स्फूर्त प्रतिक्रिया हीच तर आजची तरुणाई आहे. त्यामुळे आयुष्याचा हा वेग वाईटच आहे असं मी म्हणणार नाही. वेगावरती एवढं बोलत असताना.. कधी कधी मात्र हाच वेग माझ्या गळ्याशी आलाय हे आठवतं. नानाविध कामांमध्ये आपण सर्वच जण गुंतल्यामुळे गोंधळ उडणं, नकळतपणे काही प्रसंग, व्यक्ती मागे सुटून जाणं हे माझ्यासोबतही होतं. ही ‘पेसभरी रेस’ म्हणजे आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आयुष्याचा वेग म्हणजे वयाचं भान विसरायला लावणारा विरंगुळा आहे. जो तुम्हाला नेहमीच तरुणाईची अनुभूती देतो. सो.. एन्जॉय धिस पेस अ‍ॅण्ड स्टे यंग.

-सायली पाटील
sayali.patil@loksatta.com