विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाएवढीच चर्चा त्यांच्या रिसेप्शनचीही होत आहे. २६ तारखेला त्यांनी क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील मित्र- परिवारासाठी मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का, हरभजन सिंग आणि युवराज सिंगचा भांगडा डान्सही व्हायरल झाला आहे.

युवराज सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनुष्काला रोजी वहिनी अशी हाकही मारली. विराट आणि अनुष्कासोबतचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘आता अधिकृतरित्या अनुष्का आमची रोजी वहिनी झाली. तुम्हा दोघांना आयुष्यभराच्या एकमेकांच्या साथीसाठी शुभेच्छा.’ हरभजन सिंगनेही विरुष्कासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, ‘काल रात्री खरा भांडला नाचलो. छोट्या भावा खूप मजा आली. देव तुम्हाला सुखात ठेवो. विराट- अनुष्का रब ने बना दी जोडी.’

या स्टार कपल्सनी लोअर परेल येथील सेंट रेगिस या पंचतारांकीत हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शनला अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, उमेश यादव, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, संदीप पाटील, रविचंद्रन अश्विन अशा भारतीय संघाचे अनेक नावाजलेल्या खेळाडूंनी उपस्थिती लावली होती.

बॉलिवूडमधूनही शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा, कंगना रणौत, करण जौहर, राजकुमार हिरानी, विधु विनोद चोप्रा, अभिजात जोशी, अनुपमा चोप्रा, रमेश तौरानी, बोमन ईराणी आणि इतर अनेक कलाकार नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा द्यायला आले होते.