News Flash

‘हर्बेरिअम’चा केवळ स्वल्पविराम 

‘हर्बेरिअम’ या नावाने सुनील बर्वेने जुन्या चांगल्या, गाजलेल्या नाटकांना रंगभूमीवर पुन्हा नव्या संचात लोकांसमोर जिवंत केलं.

| September 6, 2015 02:17 am

‘हर्बेरिअम’ या नावाने सुनील बर्वेने जुन्या चांगल्या, गाजलेल्या नाटकांना रंगभूमीवर पुन्हा नव्या संचात लोकांसमोर जिवंत केलं. त्याच्या या नाटय़उपक्रमाला जुन्या आणि नव्या पिढीकडूनही तितकीच दाद मिळाली. कारण नव्या पिढीने त्या नाटकांविषयी ऐक लं होतं, पण ती पाहण्याची संधी ‘हर्बेरिअम’ने त्यांना दिली होती. सुनीलने आधी जाहीर केल्याप्रमाणे पाच दिग्दर्शकांनी निवडलेले एकेक जुने नाटक आणि नव्या संचात बसवून केलेले प्रत्येक नाटकाचे २५ प्रयोग असा हा उपक्रम पाचव्या नाटकाच्या पंचविसाव्या प्रयोगावर थांबला. पण ‘हर्बेरिअम’ पूर्णपणे थांबलेले नाही. ते नव्या संकल्पनेवर आपल्याला परत आणायचे आहे, असे सुनीलने स्पष्ट केले.‘हर्बेरिअम’चा उपक्रम जुन्या नाटकांना रंगमंचावर आणून स्वत:चा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला नव्हता. माझ्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीची २५ र्वष पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्ताने, काहीतरी वेगळं करायचं होतं. ‘सूर्याची पिल्ले’सारखी जुनी नाटके, आपली नाटय़परंपरा पुन्हा लोकांसमोर आणणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याला रसिकांनी उचलून धरलं ही गोष्ट खरी असली तरी मी तेच पुढे वाढवत राहिलो असतो तर सुनीलने नाही नाही म्हणता हा व्यवसायच सुरू केला आहे, अशी चर्चा झाली असती. मला ते मान्य नव्हतं कारण, मुळात आर्थिक फायद्यासाठी मी ‘हर्बेरिअम’ केलं नव्हतं. आता परत त्यावर काम करायची इच्छा आहे. मात्र यावेळी पूर्णपणे नव्या कल्पनेवर ‘हर्बेरिअम’चे काम असेल, असं विश्वासाने सांगणारा सुनील बर्वे हा मराठमोळा चेहरा सध्या सोनी टीव्हीवरच्या ‘जाने क्या होगा आगे’ नामक मालिके त गढून गेला आहे. जोशी कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या हिंदी मालिकेत बऱ्याच दिवसांनी सुनील बर्वेचा हसरा, खेळकर चेहरा चमकला आहे. सुनीलने याआधी हिंदी मालिकेत काम केलं आहे. मराठी नाटय़-मालिका आणि चित्रपट वर्तुळात लोकप्रिय असलेल्या सुनीलला हिंदी मालिकांच्या ऑफर्स आल्या नाहीत हे शक्यच नाही. मग इतक्या दिवसांनी हिंदी मालिका स्वीकारण्याचं कारण हे या नव्या मालिके च्या कथेत दडलंय, असं सुनीलचं म्हणणं आहे. ‘देहलीज’ ही मालिका केली तेव्हा खरं म्हणजे मी ‘कळत नकळत’ आणि मग ‘असंभव’ मधून बाहेर पडलो होतो. ‘देहलीज’नंतर मग मी ‘कुंकू’ स्वीकारली. एकापाठोपाठ एक मालिका आणि ते सांभाळून चित्रपट करतच होतो. त्यामुळे हिंदी मालिकांचा विचार करण्यासाठीही वेळ नव्हता, असं सुनील सांगतो.‘जाने क्या होगा आगे’ ही मालिका स्वीकारली कारण त्याचं कथानक खरोखरच वेगळं आहे, असं तो म्हणतो. सुनीलने यात इंदर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. इंदरची पत्नी गंगाचे (लुबना सलीम) निधन झाले आहे. मात्र काही केल्या इंदर आणि त्याची दोन मुलं गंगाच्या आठवणीतून बाहेर पडू शकत नाहीत. इंदरची मुलगी संगणकतज्ज्ञ आहे. वडिलांसाठी ती संगणकाच्या मदतीने आभासी ‘गंगा’ उभी करते आणि मग ज्या गमतीजमती घडतात त्याचे चित्रण या मालिकेत असणार आहे. आत्तापर्यंत आलेल्या मालिकांमध्ये ‘जाने क्या होगा आगे’सारखी कथेची मांडणी झालेलीच नाही, असं सुनील स्पष्ट करतो. अर्थात या मालिकेसाठी वेगळं तंत्र वापरावं लागणार होतं. मात्र सध्या मालिकांचं निर्मिती तंत्रज्ञान इतकं  भव्यदिव्य झालं आहे की अशाप्रकारची कुठलीही साय-फाय कथा मालिकेतून मांडणं हे आता अवघड राहिलेलं नाही, असं त्याने सांगितलं. हिंदी मालिकेचं मोठं बजेट सोडलं तर हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये आता फारसा फरक उरलेला नाही, असेही तो म्हणतो. ‘सोनी’सारखी मोठी वाहिनी असल्यामुळे दिवसभरात लागोपाठ आठ ते दहा प्रसंगांचे चित्रीकरण करा वगैरे ताण नसतो. निवांतपणे इथे आपल्याला काम करता येतं. शिवाय कितीतरी वेगळ्या प्रांतातून हे कलाकार आलेले आहेत. म्हणजे आमच्या मालिकेत काम करणारा एक मुलगा धनबादहून इथे आलेला आहे, तो या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी संघर्ष करतो आहे. त्यांचा संघर्ष पाहिला की आपण खूप नशीबवान आहोत, या जाणिवेने आपण सुखावतो. पण खरोखरच हिंदी मालिकांमध्ये काम करण्याचीही एक वेगळी मजा असल्याचं त्याने सांगितलं.या मालिकेआधीच सुनीलची भूमिका असलेला ‘हायवे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘सहा गुण’ हा चित्रपट त्याने केला आहे. शिवाय नाना पाटेकरांच्या ‘नटसम्राट’मध्येही त्याची छोटेखानी भूमिका आहे. योगायोगाने ‘जाने क्या होगा आगे’ ही मालिका आणि ‘सहा गुण’ या चित्रपटात तो वडील म्हणून, एक पालक म्हणून आपल्या मुलांभोवती वावरताना दिसणार आहे. याआधी, ‘बे दुणे दहा’ मालिकेतील कथानकही पालकत्वाशी संबंधित होते. पालकत्व हा खरोखर महत्त्वाचा आणि समजून घेण्याचा विषय आहे, असं तो सांगतो. आजची मुलं इतक्या पटपटा गोष्टी शिकून घेतात, त्याचं कौतुकच वाटतं. पण सोशल नेटवर्किंग साइट्स, गुगलसारख्या प्रणालीमुळे चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही तितक्याच वेगाने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यातून चांगले-वाईट काय घ्यायचे, याबद्दल त्यांचा गोंधळच उडालेला असतो आणि म्हणून त्यांना सांभाळण्याची, त्यांना दिशा देण्याची गरज असते. पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं, त्यांना घडवणं हे आज खूप महत्त्वाचं आहे, असं सुनील आवर्जून सांगतो. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून काम करायला त्याला आवडतं, त्यामुळे सर्वत्र त्याचा वावर यापुढेही असाच राहणार आहे. मात्र या तिन्ही माध्यमांत जिथे नवं काही सापडेल तिथे पहिली उडी घ्यायची.. असा सध्याचा आपला फंडा असल्याचं तो सांगतो.

‘हर्बेरिअम’चा उपक्रम जुन्या नाटकांना रंगमंचावर आणून स्वत:चा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला नव्हता. माझ्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीची २५ र्वष पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्ताने, काहीतरी वेगळं करायचं होतं. मुळात आर्थिक फायद्यासाठी मी ‘हर्बेरिअम’ केलं नव्हतं. आता परत त्यावर काम करायची इच्छा आहे. मात्र यावेळी पूर्णपणे नव्या कल्पनेवर ‘हर्बेरिअम’चे काम असेल.
सुनील बर्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 2:17 am

Web Title: harmonium is not for pure business
Next Stories
1 लेखक अजूनही दुर्लक्षितच!
2 जेमतेम करमणूक
3 शैलीच्या धुक्यात हरवलेलं ‘सुसाट’
Just Now!
X