एकामागून एक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनी जगभरात गोंधळ घातला आहे. अशाच एका हल्ल्यातून हॉलीवूड स्टार डॅनिअल रॅडक्लिफ हा थोडक्यात वाचला. ४ जून २०१७ रोजी लंडन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहाजण ठार झाले होते तर तीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात एक हॉलीवूड सेलेब्रिटीदेखील जखमी झाल्याची अफवा होती. मात्र नंतर ती अफवा नसून खरोखरच सेलिब्रिटी जखमी झाल्याची माहिती त्या घटनेचा तपास करत असलेल्या माजी पोलीस अधिकारी डेव्हिड व्हिडीकेट यांन मिळाली. सुरुवातीला त्यांनादेखील इतर लोकांप्रमाणे ही बातमी खोटी आहे असे वाटत होते. परंतु सी. सी. टीव्ही फुटेज पाहून त्या व्यक्तीचा तपास केला असता तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द ‘हॅरी पॉटर’ असल्याचे लक्षात आले. हॅरी पॉटर फेम डॅनिअलला यासंदर्भात विचारले असता सुरुवातीला त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली, परंतु नंतर आपण जखमी झाल्याचे त्याने मान्य केले.  त्या दिवशी नेहमीप्रमाणे तो खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता. अचानक त्याच्या पाठीमागून काही लोकांचा आरडाओरडा त्याला ऐकू आला. काय घडले आहे हे पाहण्यासाठी मागे फिरताच दोन व्यक्ती अंदाधुंद गोळीबार करताना त्याला दिसले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्याने सुरक्षित स्थानाच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, काही दुकानांच्या काचा फुटल्या आणि त्यात तो जखमी झाला. त्याला झालेल्या जखमा या किरकोळ स्वरूपाच्या असल्यामुळे त्याने त्याची जाहीर वाच्यता केली नाही. अशा दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला शांतपणे सदर परिस्थिती हाताळू देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. परंतु काही सेलिब्रिटी परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता केवळ प्रसिद्धीसाठी माध्यमांतून गोंधळ घालतात. डॅनिअलने मात्र शांत राहत एक आदर्श लोकांसमोर ठेवला आहे.