हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी वीनस्टीनचं प्रकरण चांगलंच गाजत असून हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात हार्वीची साधारणपणे ६ कोटी ७७ लाख रुपयांच्या जामीनावर सुटका झाली आहे. २५ मे रोजी त्याने मॅनहट्टन येथील पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्याने जीपीएस ट्रॅकर आणि पासपोर्ट देण्याचीही तयारी दर्शवली होती. त्याच्यावर ९० हून अधिक महिलांनी यौन शोषण केल्याचा आरोप केला आहे. वीनस्टीनचे असेच एकामागोमाग एक घटना सर्वांसमोर आल्यानंतर #metoo या हॅशटॅग अंतर्गत प्रतीभावान लोकांनी यौन शोषणाशी निगडीत गोष्टी जगासमोर खुलेपणाने बोलायला सुरूवात केली.

अटक होण्याआधी हार्वी स्वतःपेक्षा त्याच्या कुटुंबाला घेऊन अधिक चिंताग्रस्त होता. ‘पिपल डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हार्वी स्टँडर्ड लीगल शिष्टाचाराचे पालन करणार आहे. यादरम्यान तो स्वतःत सुधारणा करण्याकडे लक्ष देईल आणि मित्र- परिवारावर भरवसा करत आहे. ‘वेरायटी डॉट कॉम’नुसार, वीनस्टीनला कमीत कमी एका घटनेसाठी तरी आरोपी मानण्यात येईल. तसेच ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘न्यूयॉर्क डेली’नुसार, अनेक आरोपांपैकी एक मुख्य आरोप असेल तो म्हणजे २००४ मध्ये वीनस्टीनने एका ऑडिशनमध्ये लूसिया इवांसचे लैंगिक शोषण केले.

आतापर्यंत ९० हून अधिक महिलांनी वीनस्टीनवर यौन शोषण केल्याचा आरोप केला आहे. अँजेलिना जोलीपासून ते सलमा हायेकपर्यंतच्या अभिनेत्रींनी हे आरोप केले आहेत. या नावाजलेल्या अभिनेत्रींच्या आरोपानंतरच सोशल मीडियावर #meetoo हे कॅम्पेन चालवण्यात आले होते. या हॅशटॅग अंतर्गत हजारो महिलांनी त्यांना आलेले अनुभव कथन केले.