हॉलिवूड अभिनेत्रींचा लैंगिक छळ व बलात्कार केल्याच्या प्रकरणात शरण आलेला निर्माता हार्वे वेनस्टेन याची १० लाख डॉलर्सच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सत्तर महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. यूएसए टुडेने दिलेल्या बातमीनुसार हॉलिवूड निर्माता असलेला वेनस्टेन याने शरीरावर जीपीएस ट्रॅकर लावण्यास मंजुरी दिली आहे. त्याने काही महिलांवर बलात्कार केला होता. शुक्रवारी तो मॅनहटन येथे पोलिसांना शरण आला असता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या एसयूव्ही वाहनातून तो आला असता त्याच्या हातात तीन पुस्तके होती, त्यात ‘टॉड पुर्डम यांचे समथिंग वंडरफुल— रॉजर्स अँड हॅमसस्टेन ब्रॉडवे रेव्होल्यूशन’ या पुस्तकाचा समावेश होता. टीव्ही कॅमेऱ्यासमोरून तो गेला, न्यूयॉर्क पोलिस खात्याच्या मॅनहटन येथील कार्यालयात या वेळी वार्ताहरांनी गर्दी केली होती. आपण दोषी नसल्याचे वेनस्टेन याने त्याचे वकील बेंजामिन ब्रॅफमन यांच्यामार्फत सांगितले. आपण कुणाशीही विनासंमतीने लैंगिक कृत्ये केलेली नाहीत, ज्यांनी कुणी हे आरोप केले आहेत त्याला काही पुरावा नाही व सरतेशेवटी या प्रकरणांमधून आपण सुटणार आहोत असा दावा त्याने वकिलांमार्फत केला आहे. ग्वेनेथ पालट्रो, अँजेलिना जोली, सलमा हायेक, अशली जुड, उमा थुरमन, आशिया अरगेन्टो यांच्यासह १०० हॉलिवूड अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक छळ, बलात्कार व लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. न्यूयॉर्क टाइम्स व द न्यूयॉर्कने वेनस्टेनबाबतच्या आरोपांच्या बातम्या दिल्यानंतर त्याची हॉलिवूडमधील कारकीर्द उतरणीला  लागली. ल्युसिया इव्हान हिने त्याच्यावर जबरदस्ती चुंबन घेतल्याचा आरोप केला असून एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, पण तिचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.