‘मी टू’ चळवळीचा पाया ज्या प्रकरणामुळे रचला गेला त्या हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कारावासात असताना त्याला करोनाची लागण झाल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले. हार्वेवरील ‘मी टू’चे आरोप सिद्ध झाले असून त्याला २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हार्वेला न्यूयॉर्कमधील कारागृहात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हार्वेला न्यूयॉर्कमधून बुफालो इथल्या कारागृहात स्थलांतरित करण्यात आलं होतं. या कारागृहात स्थलांतरित करण्यापूर्वी त्याला रिकर आयलँड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. रिकल आयलँड जेलमध्ये असताना त्याला दुसऱ्या कैद्याकडून करोनाची लागण झाल्याचं समजतंय.

गेल्या दोन वर्षात ‘# मी टू’ या चळवळीअंतर्गत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित अभिनेत्रींनी हार्वेविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यांपैकी लॉरेन यंग, टॅरेन वुल्फ, डॉन डनिंग, मिरियम हॅले, अ‍ॅनाबेला सायरोरा या पाच अभिनेत्रींनी केलेले आरोप न्यायालयात सिद्ध झाले. परिणामी हार्वेला २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.