रेश्मा राईकवार

‘मी टू’ चळवळीचा पाया ज्या प्रकरणामुळे रचला गेला त्या हार्वे वेन्स्टिन खटल्याला आता कुठे गती मिळाली आहे. हार्वेवर ११४ अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यातल्या काहीजणींनी हार्वेने कामाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आरोपही केले होते. बडय़ा बडय़ा निर्मितीसंस्थांमध्ये अशा गोष्टी होतच असतात.. असा छुपा संदेश देत गेली कित्येक वर्ष हार्वेसह हॉलीवूडमधील काही निर्मात्यांनी नवोदित अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केले होते. मात्र इतक्या मोठय़ा निर्मात्याविरोधात कोण बोलणार? त्यांनी केलेली कृत्ये सिद्ध कशी करणार? आपल्या कारकीर्दीचे पुढे काय?, अशा अनेक प्रश्नांमध्ये अडकलेल्या अ‍ॅनाबेला स्कायरोरा, रोज मॅकगोवनसारख्या अभिनेत्रींनी गेली कित्येक वर्ष हा छळ, अपमान मनात दडवून ठेवला होता. ‘मी टू’चळवळीने मात्र अ‍ॅनाबेला, रोज, मीरियम हॅले न जाणे कित्येकींच्या मनातल्या या दुखऱ्या कोपऱ्याला वाट मोकळी करून दिली. काही निर्माते, हॉलीवूडमधील बडे प्रस्थ यांच्याविरोधात हळूहळू उठू लागलेला आवाज मोठा होत गेला, त्यात हार्वे वेन्स्टिनचे नाव आघाडीवर होते. एक, दोन, तीन करत करत आरोप करणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेल्सचा हा आकडा शंभरी पार क रून गेला तोवर ही चळवळ फक्त हॉलीवूडपुरती मर्यादित राहिलेली नव्हती. तर जगभर या चळवळीने जोर धरला होता. लैंगिक शोषण, बलात्कार, हिंसक स्वरूपातील बलात्कार असे एकापेक्षा एक गंभीर आरोप हार्वेवर झाले होते. हे आरोप करणाऱ्या अभिनेत्री बोलून थांबल्या नाहीत, त्यांनी हार्वेला न्यायालयात खेचले. अखेर, हार्वेवर खटला सुरू झाला.. न घाबरता अ‍ॅनाबेला, मीरियम यांनी न्यायालयात साक्ष दिली, वकिलांच्या उलटतपासणीला सामोरे गेल्या. गेल्या आठवडय़ाची सुरुवात हार्वे प्रकरणासाठी महत्त्वाची ठरली आहे. या खटल्यात हार्वेवरचे दोन आरोप सिद्ध झाले असून त्याला याप्रकरणी कमीतकमी २० वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. दुर्दैवाने, काही महत्त्वाच्या प्रकरणांमधले त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. पुन्हा एकदा ११ मार्चला त्याची सुनावणी होणार आहे. मात्र निदान याप्रकरणी न्याय मिळण्याची आशा तरी निर्माण झाली आहे हेही नसे थोडके..

‘फ्रेंड्स’ पुन्हा एकत्र

नव्वदच्या दशकांत अमेरिकन टेलीव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘फ्रेंड्स’ ही मालिका पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्या स्वरूपात, नव्या अवतारात दाखल होते आहे. या मालिके चे लोकप्रिय कलाकार या नव्या शोनिमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. ‘एचबीओ मॅक्स’ या मेमध्ये लाँच होणाऱ्या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वॉर्नर ब्रदर्सची ही लोकप्रिय मालिका खास नव्या स्वरूपात आणली जाते आहे. ‘फ्रेंड्स’चं वैशिष्टय़ असं की १९९४ साली पहिल्यांदा टेलीव्हिजनवर झळकलेली ही मालिका. त्याच चेहऱ्यांसह लोकांची मनं जिंकत राहिली. तब्बल दहा वर्ष या मालिकेचे दहा सीझन्स प्रदर्शित झाले आणि २००४ साली या मालिकेचे शेवटचे पर्व सादर झाले. या दहा वर्षांत टेलीव्हिजनसमोरच्या जेवढय़ा पिढय़ा बदलत गेल्या त्या सगळ्यांची ती आवडती मालिका होती आणि आजही ती तितक्याच आवडीने बघितली जाते. विशी आणि तिशीत एकत्र असलेल्या सहा मित्रमैत्रिणींची कथा सांगणारी ही मालिका त्याच्या आशयासकट सगळ्यांना आवडते. या मालिकेतला काळ वेगळा आहे खरंतर.. तेव्हाचे जीवनशैली आणि आताची जीवनशैली, आताच्या तरुणांच्या समस्या, त्यांची मैत्रीची परिभाषा सगळंच बदललं आहे. पण तरीही या मैत्रीचं रसायन काहीतरी खास आहे जे आजच्या तरुणाईलाही त्या मालिकेशी जोडून घेतं आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटनमध्ये राहाणाऱ्या या सहा मित्रमैत्रिणींच्या भूमिका जेनिफर अ‍ॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा क्रुडो, मॅट लेब्लँक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर यांनी साकारल्या होत्या. या मालिके च्या शेवटच्या पर्वापर्यंत हेच कलाकार मालिकेचा चेहरा राहिले आहेत. त्यामुळे नव्या पर्वाचा घाट घालतानासुद्धा हीच मंडळी एकत्र असणार यात शंका नाही. आम्ही फ्रेंड्स रियुनियनच्या माध्यमातून पुन्हा भेटणार आहोत, मात्र याचं स्वरूप नेमकं काय असेल?, याची आम्हालाही अजून पुरेशी कल्पना नाही, असं या मंडळींनी सांगितलं आहे. ओटीटी प्लॅटफॉम्र्समध्ये सध्या कडवी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत कोण किती चांगला आशय देतं आहे, यासाठीची चढाओढ सुरू आहे. त्याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जुनं ते सोनं या उक्तीने जुन्या लोकप्रिय मालिकांचा शोध घेतला जातो आहे. ‘फ्रेंड्स’ नेटफ्लिक्सवरही उपलब्ध झाली होती, त्यामुळे नव्या पिढीलाही ती माहिती आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हे नव्या पिढीचे माध्यम असल्याने त्यांनाही बांधून घेण्याची क्षमता ‘फ्रेंड्स’मध्ये आहे हे लक्षात घेऊन ‘एचबीओ मॅक्स’वर ती नव्या स्वरूपात आणली जाते आहे, असे एचबीओ समूहाच्या वतीने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात, एक काळ गाजवणारी ही मालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या दशकात नव्या प्रेक्षकांशी मैत्रीचा सूर जोडू शकेल का?, हे पाहण्यासाठी अंमळ वाट पहावी लागणार आहे.