बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख नुकतीच जाहीर झाली. गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले रणवीर- दीपिका १४ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. दीपिका अभिनेत्री आलिया भट्टसोबत तर रणवीर अक्षय कुमारसोबत या चॅट शोमध्ये आला. यावेळी करण जोहरने दोघांनाही लग्न, अफेअर, वैयक्तिक आयुष्य याबद्दल बरेच प्रश्न विचारले. पण अवलिया रणवीरच्या स्वभावाला वैतागून अक्षयने दीपिकाच्या हिंमतीलाच दाद दिली.

अक्षय आणि रणवीरच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीरच्या स्वभावाबद्दल अनेकांनाच माहीत आहे. मस्तीखोर, बोलका अशा रणवीरला वैतागून अक्षय म्हणतो, ‘इस इन्सान के साथ रहना मतलब.. हॅट्स ऑफ टू दीपिका!’ अतरंगी रणवीरचा स्वभाव ओळखून त्याच्यासोबत दीपिका कशी निभावून घेते असा गमतीशीर प्रश्न अक्षयने विचारला.

वाचा : ‘..म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून बाहेर पडलो’; १० वर्षांनंतर शर्मनचा खुलासा

‘कॉफी विथ करण’चा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय आणि रणवीरनेसुद्धा या शोमध्ये धमाल मस्ती केली. त्याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.