‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील अभिनेता रॉनित रॉय हा टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वात चांगलाच प्रसिद्ध आहे. लॉकडाउनमुळे सर्वच कलाकारांवर उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे काही कलाकारांनी आत्महत्यासुद्धा केली. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लढा देण्याचा सल्ला रॉनित रॉय या कलाकारांना देतोय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रॉनितने त्याच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. “कलाकारांचे थकलेले पैसे निर्मात्यांना द्यावेच लागतात. लॉकडाउनमुळे परिस्थिती खूप बिकट आहे. तुम्ही अधिकचे पैसे नका देऊ पण त्यांनी जेवढं काम केलंय, तेवढे तरी पैसे द्या अशी विनंती मी निर्मात्यांना करतो. लॉकडाउनमुळे आता प्रत्येकावर शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण आहे. जानेवारी महिन्यापासून मीसुद्धा एक पैसा कमावलेला नाही. माझा छोटा व्यवसाय होता आणि मार्चपासून तोसुद्धा बंद आहे. १०० कुटुंबांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी एक एक सामान विकून त्यांची मदत करतोय. मी काही श्रीमंत नाही, पण माझ्याने जेवढं होईल तेवढं मी करतोय. त्यामुळे मोठमोठ्या प्रॉडक्शन कंपन्यांनी थोडीफार तरी मदत करावी”, असं तो म्हणाला.

प्रॉडक्शन कंपन्यांनी घरी बसलेल्या कलाकारांना, कर्मचाऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत करावी, अशी विनंती त्याने केली आहे. त्याचसोबत या परिस्थितीमुळे खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचं आवाहन त्याने केलंय.