झगमगणाऱ्या कलाविश्वाचा प्रत्येक होतकरु कलाकाराला हेवा वाटतो. पण त्याच झगमगत्या कलाविश्वाला डाग लागला आहे तो म्हणजे कास्टिंग काऊचचा. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरुन एक वक्तव्य करत पुन्हा एकदा या विषयाला नवी वाचा फोडली. खान यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निर्माण झालेलं संतापाचं वातावरण पाहून त्यानंतर माफीही मागितली. पण, तोवर फारच उशिर झाला होता. कारण, आता संपूर्ण कलाविश्वात या एकाच विषयाच्या चर्चांना उधाण आलं आहे. कास्टिंग काऊचच्या या मुद्द्यावर अभिनेत्री राधिका आपटेने पुन्हा एकदा काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. फक्त राधिकाच नव्हे तर, मराठमोळी अभिनेत्री उषा जाधनवेही तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग उघडकीस आणला आहे.

‘बीबीसी’च्या एका माहितीपटातून या अभिनेत्रींनी कलाविश्वाचा खरा चेहरा उघड केला असून, लवकरच हा माहितीपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. कलाविश्वाच्या या चेहऱ्याविषयी उघडपणे बोलण्याची राधिकाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेकदा कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर खुलेपणाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, या माहितीपटात ती नेमकं काय बोलली आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला आहे. ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘काही लोक या कलाविश्वात स्वत:ला जास्त महत्त्वाचं स्थान देऊ पाहतात. माझ्या एकटीच्या आवाज उठवण्यानं कोणाला काहीच फरक पडणार नाही, असंच त्यांना वाटतं. मी जर का तोंड उघडलंच तर माझ्या कारकिर्दीला धोका निर्माण होईल असंही अनेकांना वाटतं’, असं राधिका म्हणाली. राधिकाच्या मते हॉलिवूडमध्ये ‘#MeToo’ही याच धर्तीवर सुरु झाला असावा. आतातरी निदान ही सर्व दुष्कृत्य थांबावीत असा निर्धार त्यांनी केला असावा अर्थात भारतातही आता तेच वारे वाहत आहेत, असं तिच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं.

उषा जाधवनेही या माहितीपटात अशा गोष्टींचा उलगडा केला आहे, ज्या ऐकून खरंच हे असंही होतं कलाविश्वात, हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करुन जाईल. उषाने स्वत:सोबत घडलेला कास्टिंग काऊचच्या प्रसंगाला या माहितीपटातून वाचा फोडली आहे. चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या प्रस्थांनी कशा प्रकारे आपल्याला शारीरिक संबंधांसाठी विचारलं होतं, याविषयी तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याच्या बदल्यात उषाकडे परतफेड करण्यासाठी एक मागणी करण्यात आली. पण, आपल्याकडे परतफेड करण्यासाठी तितके पैसे नसल्याचं तिने त्या व्यक्तीला सांगितलं. पण, मुळात त्या व्यक्तीने उषाकडे पैशांची नव्हे, तर शारीरिक संबंधांची मागणी केली होती. निर्माते किंवा दिग्दर्शक किंवा या दोघांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्याविषयी तिला विचारण्यात आलं होतं. या साऱ्याचा खुलासा खुद्द उषाने या माहितीपटात केल्याचं वृत्त ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलं.

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जातंय- रिचा चड्ढा

एक अभिनेत्री म्हणून या कलाविश्वात आलेल्या उषाचा विनयभंग झाल्याचंही तिने स्वत: सांगितलं. ‘एक अभिनेत्री म्हणून तुला शारीरिक संबंधाविषयी आनंदच वाटला पाहिजे, असं तो मला म्हणाला. त्यानंतर त्याने मला स्पर्श करण्यास सुरुवात केली. अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, माझ्या शरीराचे चुंबन घेऊ लागला. माझ्यासाठी हे सर्व धक्कादायक होतं. त्याचे हात माझ्या कपड्यांमध्ये जात होते. पण, तेव्हाच मी त्याला थांबण्यास सांगितलं. त्याचवेळी या चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तू आलीयेस खरी. पण, तुझं हे असं वागणं चुकीचं आहे, असं तो मला म्हणाल्याचं उषाने स्पष्ट केलं. उषा आणि राधिकाने केलेला हा उलगडा आणि कलाविश्वाच्या या झगमगाटामागे आणखी काय दडलंय हे आता त्या माहितीपटातून लवकरच सर्वांसमोर येणार आहे.