प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीने आपल्या संसदीय कामकाजातून थोड्या दिवसांची सुट्टी घेऊन रमेश सिप्पी यांच्या ‘शिमला मिर्ची’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. तिच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेला अभिनेता राजकुमार रावबरोबर ती चित्रपटात रोमान्स करताना दिसणार असून, रमेश सिप्पीदेखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या सेटवरील छायाचित्रासोबत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात हेमा मलिनी म्हणते, माझे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याबरोबर ‘शिमला मिर्ची’ चित्रपटाच्या शुटिंगचा पहिला दिवस. या चित्रपटात ते एक खास भूमिका साकारत आहेत. या आधी हेमा मालिनी आणि रमेश सिप्पी यांनी ‘अंदाज’, ‘शोले’ आणि ‘सीता और गीता’इत्यादी चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. ‘शिमला मिर्ची’ चित्रपटात राकुल प्रीत सिंहदेखील काम करत आहे.