बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. हेमा मालिनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेदेखील तितक्याच चर्चेत राहिल्या. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या हेमा यांच्या संपत्ती गेल्या पाच वर्षांत तब्बल ३४.४६ कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा १०१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांची संपत्ती ६६ कोटी इतकी होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान हेमा मालिनी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे पती आणि अभिनेता धर्मेंद्र यांच्या संपत्तीत 12.30 कोटींची वाढ झाली आहे. प्रतिज्ञातत्रात आयकर परताव्याची माहिती दिली असून दांपत्याने गेल्या पाच वर्षात प्रत्येक वर्षी 10 कोटींची कमाई केली आहे.

हेमा मालिनी यांनी 2013-14 मध्ये जिथे 15 लाख 93 हजार रुपयांची कमाई केली होती तिथे 2017-18 मध्ये हा आकडा 1 कोटी 19 लाखांवर गेला होता. प्रतिज्ञापत्रानुसार, 2014-15 मध्ये हेमा मालिनी यांनी 3.12 कोटी, 2015-16 मध्ये 1.19 कोटी आणि 2016-17 मध्ये 4.30 कोटींची कमाई केली. यानुसार, हेमा मालिनी यांनी गेल्या पाच वर्षात 9.87 कोटी आणि धर्मेंद्र यांनी 9.73 कोटींची कमाई केली.

प्रतिज्ञापत्रानुसार, हेमा मालिनी यांच्याकडे दोन कार असून यामध्ये 33.62 लाखांची मर्सिडीजदेखील आहे. 2011 मध्ये त्यांनी मर्सिडीज विकत घेतली होती. दुसरीकडे धर्मेद्र विेटेज कारचे चाहते आहेत त्यामुळे 1965 मध्ये सात हजार रुपयांत विकत घेतलेली रेंज रोव्हर त्यांनी अद्याप विकलेली नाही. याशिवाय त्यांच्याकडे मारुती 800 आणि मोटरसायकलदेखील आहे.