अभिनय, दिग्दर्शन, राजकारण आणि नृत्यानंतर आता गायन क्षेत्रातही बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ आपला ठसा उमटवण्यास सज्ज झालीये. १४ ऑगस्टला जन्माष्टमीच्या मुहूर्तावर हेमा मालिनी यांचा भजन अल्बम प्रदर्शित होणार आहे. ‘गोपाल को समर्पन’ असं या अल्बमचं शीर्षक असून जुहू येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात हा भजन अल्बम प्रदर्शित होणार आहे. उस्ताद पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, राजन-साजन मिश्रा यांसारख्या दिग्गजांनी मिळून अल्बममधील भजन संगीतबद्ध केलंय. या अल्बममध्ये ८ भजनांचा समावेश आहे. लता मंगेशकरांच्या स्टुडिओमध्ये या भजन अल्बमचं रेकॉर्डिंग झालंय.

या अल्बमबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘कवी नारायण अग्रवाल यांचं सर्व श्रेय आहे. त्यांनीच अल्बममधील आठही भजन लिहिले. जेव्हा त्यांनी मला गायनासाठी विचारलं तेव्हा मला थोडा संकोच झाला. गायनाचं शिक्षण न घेतल्याने मला आत्मविश्वास नव्हता. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मला सर्व गायनांच्या रचना ऐकण्यास सांगितले. तेव्हा मला जाणवलं की पंडीत जसराज, पंडीत हरिप्रसाद किंवा शिव कुमार शर्मा यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी काही रोज मिळत नाही आणि अखेर मी गायनाचा निर्णय घेतला.’

वाचा : राखी सावंतला अटक करा; कोर्टाचे आदेश

गायनासाठी तयारी कशाप्रकारे केली हे सांगताना त्या म्हणाल्या की, ‘प्रवासादरम्यानही मी गाण्याचा सराव करत होते. हेडफोन्स कानात लावून मी सराव करु लागले. गुरु गगन सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली मी सहा महिने रियाझ केला.’

वाचा : हरयाणाच्या भाजप नेत्यावर रवीना टंडनची सडकून टीका

हेमा मालिनी यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा किशोर कुमार यांचं ‘गुन गुन कोरे जे मोन’ हे गाणं गायलं होतं. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियोसोबतचा त्यांचा जुगलबंदी म्युझिक व्हिडिओ ‘अजी सुनिए तो जरा’ प्रदर्शित झाला होता. आता येत्या गोकुळाष्टमीला ‘ड्रीम गर्ल’च्या सुरेल आवाजातील भजन ऐकायला मिळणार.