८८ व्या ऑस्कर पुरस्कारांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात या पुरस्कारासाठी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या चित्रपटांची नावे जाहीर होणार आहेत. भारताकडून ‘सवरेत्कृष्ट परभाषिक चित्रपट’ विभागासाठी ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट पाठवण्यात आला आहे. पण, यावेळी ‘कोर्ट’बरोबरच पुरस्काराच्या स्पर्धेत अन्य भारतीय प्रादेशिक चित्रपटांनीही हजेरी लावली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळवण्यास मान्य ठरलेल्या ३०० चित्रपटांच्या यादीत डॉ. समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली असून अजून चार प्रादेशिक चित्रपटही या यादीत आहेत.
‘मॅगसेसे’ पुरस्कारविजेत्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’ हा समृद्धी पोरे दिग्दर्शित मराठी चित्रपट या वर्षांच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाला होता. त्याच चित्रपटाचा काही भाग पुन्हा चित्रित करून तो ‘हेमलकसा’ या नावाने हिंदीत तयार करण्यात आला आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हेमलकसा’ हा समृद्धी पोरे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट असून हा चित्रपट जगभर पोहोचावा या उद्देशाने तो हिंदीत केल्याचे समृद्धी पोरे यांनी सांगितले. ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या खुल्या गटातील चित्रपट विभागाचे नामांकन मिळवण्याच्या स्पर्धेत ‘हेमलकसा’ हा चित्रपट उतरला आहे. जगभरातून ३०० चित्रपट या गटातून नामांकन मिळवण्यासाठी स्पर्धा करत असून यात ‘हेमलकसा’ या चित्रपटासह ‘नाचोमिया कुम पसार’ हा कोकणी चित्रपट, मल्याळम चित्रपट ‘जलम’, तेलुगू चित्रपट ‘रंगी तरंग’ आणि इंडो-ऑस्ट्रेलियन चित्रपट ‘सॉल्ट ब्रिज’ यांचा समावेश आहे.
या गटात नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी फेब्रुवारीतच जाहीर होणार असल्याचे पोरे यांनी सांगितले.
प्रसिद्ध झालेली यादी ही सर्वसाधारण गटातील सिनेमांची असून, परभाषिक गटातील नामांकित सिनेमांची संपूर्ण यादी येत्या काही दिवसांत जाहीर होईल.
– चैतन्य ताम्हाणे, दिग्दर्शक कोर्ट