करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना ससंर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचा थेट परिणाम शहरातल्या स्मशानभूमीत दिसू लागला आहे. दिल्लीमध्ये स्मशानभूमी बाहरे मृतदेहाची रांग लागल्याचे विदारक दृष्य पहायला मिळाले. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असताना दिल्लीत एका बागेचं स्मशानभूमीत रुपांतर करण्यात आले. या संदर्भात अभिनेता हेमंत ढोमेने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेमंत ढोमेने ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने, ‘बाग म्हणजे… खेळायची जागा…आजी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची… चिऊताई… खारूताई बघायची जागा… साळुंखीची जोडी शोधायची जागा… तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं… पण आपण सारे मिळुन या राक्षसाला हरवु! पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवू!’ असे म्हटले आहे.

सध्या सोशल मीडियावर हेमंतची ही पोस्ट चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत दु:ख व्यक्त केले आहे. पण या पोस्टमध्ये हेमंतने साकारात्मक संदेशही दिला आहे.