देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसींच्या कमतरतेची समस्या काही ठिकाणी भासत असली तरी काही ठिकाणी लसीकरण सुरु आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अशाच एका ठिकाणी लसीकरणासाठी लागलेली रांग आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबद्दल अभिनेता हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

हेमंतने लसीकऱण केंद्रावरची गर्दी आणि त्यामुळे होणारी असुविधा यावर ट्विट करत व्यवस्थेतल्या फोलपणावर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “कमीत कमी १ किलोमीटर तरी! गेटवर चेंगराचेंगरी…सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये..माणसाला माणसासारखं तरी वागवा..महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय.”

हेमंतने आपल्या ट्विटसोबत काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनेक नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे राहिले असल्याचं दिसत आहे. या फोटोंबद्दल हेमंत म्हणतो, “सर्व नियम पाळणारा, सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा, या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणूस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यासाठी) रांगेत उभा आहे. उन्हातान्हाचा कुठल्याही सावलीशिवाय खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को(गोरेगाव, मुंबई)बाहेर लांब रांग!”

मुंबईतल्या एका लसीकरण केंद्राबाहेर लागलेल्या रांगेचे फोटो त्याने शेअर केले आहेत. हेमंतने काल केलेलं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात तसंच राज्यातही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर्स अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. देशातली परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.