काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे एकाच वेळी या सिनेमातून झळकणार आहेत. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळतील.

एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्यानं सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी झिम्मा सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा धमाकेदार असेल हे लक्षात येतंय. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा रंजक प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांचा इंग्लंडमधील सफर या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. तर या सात महिलांना इंग्लडची सफर घडवत असताना एकट्या सिद्धार्थ चांदेकरची झालेली तारांबळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

बायकांच्या मनात काय सुरु आहे,त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला ‘झिम्मा’मध्ये पाहायला मिळणार आहे.
या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र सिनेमा पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे हे दिसून येतंय.

हेमंत ढोमे यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून येत्या २३ एप्रिलला ‘झिम्मा’ प्रदर्शित होणार आहे.