बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बॉलिवूडमधला हा सर्वात मोठा विवाहसोहळा असणार आहे हे नक्की. अजूनही या दोघांच्या लग्नाची तारिख ठरायची आहे. पण २ डिसेंबरला ते दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे जोधपुरमधल्या मेहरंगगढ किल्ल्यावर तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रियांका आणि निकनं मेहरंगगढला भेट दिली होती. तिथेच हे दोघंही लग्न करतील असं म्हटलं जात आहे. प्रियांका सध्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. २५ नोव्हेंबर ते डिसेंबर १७ या काळात तिनं चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे. त्यामुळे तिचा विवाहसोहळा याच काळात पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. २९ नोव्हेंबर पासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. निकच्या मित्रपरिवारातील जवळपास १०० हून अधिक पाहुणे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रियांकानं लग्न कोणासोबतही करावं, मला काहीच हरकत नाही मात्र तिनं ते पारंपरिक भारतीय पद्धतीनं करावं अशी इच्छा तिच्या आईनं व्यक्त केली होती. तेव्हा आईच्या इच्छेप्रमाणे तिनं पारंपरिक पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं आहे. प्रियांकाच्या जवळच्या व्यक्तीच्या माहितीनुसार २९ नोव्हेंबरला संगीत, त्यानंतर मेहंदी असा कार्यक्रम पार पडणार आहे.