बॉलिवूडच्या भयपटांना बॉक्स ऑफीसवर अपेक्षित यश फार क्वचित मिळतं. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडचा एक भयपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे अनुष्का शर्मा ‘परी’. पोस्टर, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेल्या या भटपटातील तिच्या लूकची विशेष चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. ‘परी’मध्ये ती साकारत असलेल्या रुक्साना या भूमिकेने टीझर आणि ट्रेलरमधून प्रेक्षकांचा थरकाप उडवला आहे. तिच्या या भयानक लूकमागे प्रसिद्ध ब्रिटीश प्रोस्थेटिक डिझायनर क्लोवर वूटनची खरी मेहनत आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी साधलेल्या संवादात क्लोवरने हा लूक कसा साकारला याबद्दलची सविस्तर आणि तितकीच रंजक माहिती दिली. ‘अनुष्का साकारत असलेली रुक्साना बऱ्याच शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरी गेलेली असते. हीच गोष्ट लक्षात ठेवत तिचा लूक ठरवण्यात आला. विस्कटलेले केस, कोरडी त्वचा आणि घाबरवणाऱ्या लूकसोबतच तितकाच आकर्षक चेहरा वाटला पाहिजे, याची काळजी घेण्यात आली.’

British Prosthetic Designer, Clover Wootton.
क्लोवर वूटन, ब्रिटीश प्रोस्थेटिक डिझायनर

अनुष्काचा भयानक लूक साकारताना तो अगदीच विचित्र वाटणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेतल्याचं क्लोवरने स्पष्ट केलं. ‘अनुष्काची त्वचा अत्यंत सुंदर आहे आणि त्यावर मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. निळेशार डोळे आणि चेहऱ्यावर हलके डाग यांमुळे ती सामान्यांसारखी नसून काहीशी वेगळी असल्याचा भास निर्माण करता आला. ती अनुष्का नसून रुक्साना आहे, हे प्रेक्षकांना या लूकमधून पटवून देण्याचं सर्वात मोठं आव्हान माझ्यासमोर होतं.’ असं ती पुढे म्हणाली.

https://www.instagram.com/p/BfNKW3sgk7a/

‘क्लिन स्लेट फिल्म्स’ निर्मित हा चित्रपट होळीच्या दिवसांत म्हणजेत २ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.